पत्नीची फिर्याद.. पतीने केले अल्पवयीन मुलीशी लग्न; पतीसह नऊ जणांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 04:22 PM2020-06-12T16:22:38+5:302020-06-12T16:24:07+5:30
नव-याने अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याची फिर्याद त्याच्या बायकोने नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नेवासा : नव-याने अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याची फिर्याद त्याच्या बायकोने नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
संगीता महादू खेमनर (वय ३०, रा. साकूर, ता. संगमनेर, हल्ली रा. अंमळनेर, ता. नेवासा) हिने याबाबत फिर्याद दिली आहे. संगीता ही अंमळनेर (ता. नेवासा) येथे आई, वडील,भाऊ, भावजयी यांच्यासह राहते. तिचा विवाह महादू खंडू खेमनर (रा. साकूर, जांभळवाडी, ता. संगमनेर) याच्याशी २४ मार्च २००८ रोजी अंमळनेर येथे झाला.
लग्नानंतर दोन वर्ष पतीसह सासरच्यांनी व्यवस्थित नांदविले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी किरकोळ कारणातून त्रास देण्यास सुरूवात केली. पतीही वारंवार छोट्या कारणावरूनही मारहाण करायचा. अनेकदा उपाशीपोटीही ठेवायचे. याबाबतची माहिती वडील रामदास सोन्याबापू बाचकर यांना दिली. त्यांनी संगीता हिला माहेरी नेले. तेव्हापासून ती वडिलांकडे माहेरी राहत आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
२६ मे २०२० रोजी संगीताचा पती महादू खेमनर याने खुपटी येथे महादेव मंदिरात दुपारी २ वाजता एका अल्पवयीन मुलीशी लग्न केले. सासरा खंडू बायजी खेमनर, सासू गंगुबाई खंडू खेमनर, रख्मा खंडू खेमनर, जालिंदर खंडू खेमनर (सर्व रा. साकूर, जांभूळवाडी, ता. संगमनेर), धोंडीबा लक्ष्मण पुणेकर व अल्पवयीन मुलीचे आई, वडील, मामा यांनी लग्न लावले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पती महादू खंडू खेमनर याच्यासह नऊ जणांविरोधात बाल विवाह प्रतिबंधित कलमानुसार गुन्हा दाखल झाला.