नगर तालुक्यात वन्यजीव सैरभैर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:20 AM2021-05-14T04:20:05+5:302021-05-14T04:20:05+5:30
केडगाव : नगर तालुक्यातीत पाण्याचे स्रोत आटत असल्याने वन्यप्राण्यांसाठी ठिकठिकाणी तयार करण्यात आलेले पाणवठे कोरडे पडत आहेत. पाण्याच्या शोधात ...
केडगाव : नगर तालुक्यातीत पाण्याचे स्रोत आटत असल्याने वन्यप्राण्यांसाठी ठिकठिकाणी तयार करण्यात आलेले पाणवठे कोरडे पडत आहेत. पाण्याच्या शोधात वन्यजीवांची भटकंती सुरू असून कोरोनाच्या संकटामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यात ८ हजार ३१६ हेक्टर वनक्षेत्र आहे. हिवरे बाजार, केकताई, गुंडेगाव, जेऊर, डोंगरगण, मांजरसुंबा, कामरगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. तालुक्यात मोर, लांडोर, चिंकारा, काळवीट, रानडुक्कर, तरस, ससे, लांडगे, गायबगळा, कोल्हा, खोकड, रानमांजर यांसारख्या वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. गुंडेगाव वनक्षेत्रात वन विभागाच्यावतीने कोट्यवधी रुपयांचा निधी वन्यप्राणी संवर्धन तसेच विविध विकास कामांसाठी मिळत आहे. वनक्षेत्रातील पाणवठे पाण्याअभावी कोरडे पडल्याने वन्यजीव तहानलेले असून पाण्यासाठी व्याकुळ झाले आहेत. पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.
गुंडेगावला ८३५ हेक्टर वनक्षेत्र आहे. यामध्ये वन्यप्राणी तसेच चिंकारा जातीच्या हरणांसह विविध पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपासून वनक्षेत्रातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पाणवठे कोरडे ठाक पडले आहेत. परिणामी वन्यप्राण्यांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत. पाण्याच्या शोधार्थ भटकणारे प्राणी एखाद्या विहिरीत किंवा शेततळ्यात पडल्याने जखमी होतात. काही वेळा तर पाण्याच्या शोधात निघालेल्या प्राण्यांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागत आहे, तर काही प्राणी वाहनांच्या धडकेत जखमी होत आहेत. वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे ठाक पडल्याने, वन्यजीवांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या सौरपंपांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. वन खात्याच्या जंगलात तेही प्रामुख्याने महाराष्ट्रातील वनात आढळणारे सांबर, चितळ, चिंकारा या जातीची हरणे या वनक्षेत्रात आहेत. विविध भागातही वन्यजीव पाण्यासाठी भटकत आहेत. वन विभाग काही सामाजिक संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ते दरवेळी पाणवठे तयार करून त्यात पाणी सोडतात. मात्र सध्या कोरोनाचे संकट असल्याने या वन्यप्राण्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
---
कडक उन्हाळ्यात पाण्याअभावी वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे ठाक पडले आहेत. वन्यजीवांच्या पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून बसविलेल्या सौरऊर्जा पंपांचा बट्ट्याबोळ झाला आहे. वन्यप्राणी पाण्यासाठी व्याकुळ झाले असून ते पाण्यासाठी मानवी वस्तीकडे भटकत आहेत. असेच सुरू राहिले तर वन्यजीवसृष्टी नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही.
- संजय भापकर,
प्रसिद्धी प्रमुख, निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळ
---
वनक्षेत्रातील पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्यात येत आहे. काही पाणवठे लिकेज झाले आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नाही. प्लास्टिक कागद टाकला, तर वन्यप्राणी कागद फाडत आहेत. वन्यजीव जगविण्यासाठी आम्ही योग्य ती पावले उचलत आहोत. कोरडे पडलेल्या पाणवठ्यांमध्ये त्वरित पाणी सोडण्यास सांगण्यात आले आहे.
- सुनील थिटे,
तालुका वन अधिकारी
---
कामरगावमध्ये आम्ही लोकसहभागातून पाणवठे तयार केले आहेत. त्यात नियमित पाणी सोडले जाते. हिरवा चाराही टाकला जातो.
- तुकाराम कातोरे,
सरपंच, कामरगाव
----
१३ पाणवठे