वन्यजीवांची वणवण थांबणार !
By Admin | Published: October 20, 2016 01:02 AM2016-10-20T01:02:13+5:302016-10-20T01:28:50+5:30
योगेश गुंड , अहमदनगर गेल्या चार ते पाच वर्षांपासून पावसाअभावी होणारी वन्यप्राण्यांची होरपळ यंदा होणार नाही. परतीच्या पावसाने बऱ्यापैकी कृपा केल्याने वन्यजीवांसाठी चारा
योगेश गुंड , अहमदनगर
गेल्या चार ते पाच वर्षांपासून पावसाअभावी होणारी वन्यप्राण्यांची होरपळ यंदा होणार नाही. परतीच्या पावसाने बऱ्यापैकी कृपा केल्याने वन्यजीवांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न यावर्षांपुरता सुटला आहे. यामुळे नगर तालुक्यातील वन्यप्राण्यांना करावी लागणारी भटकंती यंदा करावी लागणार नाही. मुबलक चारा, पाण्यामुळे वन्यजीव सुखावला आहे.
नगर तालुक्यात सुमारे ८ हजार ४०० हेक्टर इतके वनक्षेत्र आहे. या क्षेत्रावर हरीण, काळवीट, तरस, लांडगे, कोल्हे, ससा, मोर, खोकड तसेच अन्य वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून नगर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तलाव तसेच अन्य पाणी साठे सतत कोरडे पडत असल्याने व चाऱ्याची कमतरता असल्याने या वन्यजीवांना पाणी, चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत होती. उन्हाळ्यात जिथे माणसांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता तिथे या मुक्या जीवांना तर वणवण करण्याची वेळ आली होती.
काही निसर्गप्रेमींनी वन्यप्राण्यांचे अस्तित्व असणाऱ्या माळरानात पाणवठे तयार करून त्यांना दुष्काळात दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र परतीच्या पावसाने चांगली कृपा केली. नगर तालुक्यात बहुताश ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याने तलाव, बंधारे, समतलचर, पाणवठे यांच्यात बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. तसेच पावसामुळे हिरवा चारा मुबलक उपलब्ध झाल्याने या वन्यप्राण्यांना पाणी आणि चारा यासाठी करावी लागणारी भटकंती यावेळी करावी लागणार नाही.
नगर तालुक्यात गुंडेगाव, देऊळगावसिद्धी, अकोळनेर, चास, कामरगाव, भोयरेपठार, घोसपुरी, सारोळाकासार, जेऊर, चिचोंडीपाटील, रांजणी, माथनी, डोंगरगण, हिवरे बाजार आदी परिसरात वन्य प्राण्यांचे मोठे अस्तित्व आहे.
नगर तालुका व परिसरात सुमारे १५० पक्ष्यांच्या जाती अस्तित्वात आहेत. मात्र पाण्याअभावी त्यांची संख्या व अस्तित्व कमी होत गेले. यावेळी चांगला पाऊस झाला. कापूरवाडी, पिंपळगाव माळवी या मोठ्या तलावात भरपूर पाणीसाठा झाला आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासून ते कोरडे असल्याने स्थलांतरीत व विदेशी पक्ष्यांचे आगमन येथे होऊ शकले नाही. यावेळी पाणीसाठा वाढला आहे. यामुळे काही वर्षापासून दिसेनासा झालेला ‘फ्लेमिंगो’ हा आकर्षक पाहुणा पक्षी यंदा नगरच्या तलावावर विहरण्यासाठी येण्याची शक्यता आहे. पक्षी निरीक्षणाचा आनंद नगरकरांना घेता येईल, असे पक्षी अभ्यासक डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.