चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २२ मार्चला होणार असून यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने युध्द पातळीवर तयारी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २२ मार्चला होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने युध्द पातळीवर तयारी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. यंदा या परीक्षेचे पर्यवेक्षण माध्यमिक शिक्षकांनी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत. यामुळे परीक्षेसाठी साडेतीन हजार माध्यमिक शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने यंदा शिष्यवृत्ती परीक्षेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी या परीक्षेत जिल्ह्यातून जास्तीतजास्त विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकावेत, यासाठी विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. शिष्यवृत्तीसाठी चौथी इयत्तेतून ६१ हजार ४८२ विद्यार्थी तर सातवी इयत्तेतून ३१ हजार ४0९ विद्यार्थी बसणार आहे. परीक्षा परिषदेच्या सूचनेनुसार परीक्षेपूर्वी दहा दिवस अगोदर विलंब शुल्कासह अर्ज करून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे. यंदा परीक्षेसाठी चौथीचे ३0५ केंद्र तर सातवीचे १९८ केंद्र राहणार आहेत. या ठिकाणी केंद्र संचालक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षेसाठी शिक्षण विभागाला साडेतीन हजारहून अधिक माध्यमिक शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे. परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात असून परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात येणार्या सूचनांचे पालन करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)
■ परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत येणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण चांगले आहे. मात्र, हेच प्रमाण राज्य गुणवत्ता यादीत वाढविण्यासाठी शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या माध्यामातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जास्तीतजास्त गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तर विद्यार्थ्यांच्या दोन सराव परीक्षा घेण्यात आल्या असून वेळ मिळाल्यास तिसरीही सराव परीक्षा घेण्याचा विचार सुरू आहे.
Web Title: Will appoint three thousand teachers for the scholarship?