नगर शहरात साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा
By अरुण वाघमोडे | Published: January 13, 2024 06:45 PM2024-01-13T18:45:35+5:302024-01-13T18:45:58+5:30
या कामाचे २० जानेवारी रोजी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते भूमिपूजन होणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अहमदनगर: अनेक वर्षांचा न्यायालयीन संघर्ष, आंदोलने व आंबेडकरी चवळीतील कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यातून अखेर नगर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पृर्णाकृती पुतळा महापालिकेच्या माध्यमातून साकारणार आहे. शहरातील मार्केट यार्ड चौकातील आधीच्या पुतळ्याच्या जागीच १८ फुटी चबुतऱ्यावर १० फुटी पुतळा बसविण्यात येणार आहे. तसेच परिसरात सुशोभिकरणही करण्यात येणार आहे. या कामाचे २० जानेवारी रोजी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते भूमिपूजन होणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी पुतळा कृती समितीचे नेते अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुमेध गायकवाड, मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ, प्रदीप पठारे, माजी स्थायी समिती सभापती कुमार वाकळे, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता परिमल निकम, श्रीकांत निंबाळकर, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, राहुल कांबळे आदी उपस्थित होते. पुतळा उभारणीसंदर्भात ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी सांगिले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या पुतळ्यानंतर त्या पुतळ्याची प्रतिकृती नगर शहरात उभारण्यात येत आहे. १८ फुटी चबुतऱ्यावर १० फुटी पुतळा व एकूण उंची २८ फुटांची राहिल. येत्या सहा महिन्यांत या पुतळ्याचे काम पूर्ण होणार आहे. २० जानेवारी सायंकाळी ५ वाजता भूमिपूजन होणार आहे. यावेळी पांजरपोळ मैदानावर गायक अजय देहाडे यांच्या भीम संगीताची मैफिल होणार आहे.