अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची रिती झालेली झोळी भरणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:10+5:302021-09-16T04:27:10+5:30
शेवगाव : गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तालुक्याला झोडपले. हजारो हेक्टर शेतामधील पिके पाण्याखाली गेली. आता शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत ...
शेवगाव : गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तालुक्याला झोडपले. हजारो हेक्टर शेतामधील पिके पाण्याखाली गेली. आता शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत. या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तर होणार नाही. मात्र, काही प्रमाणात का होईना, दिलासा देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांची रिती झालेली झोळी शासन भरणार का, अशी आशा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्याच्या निमित्त शेतकऱ्यांना आहे.
तालुक्यात ३० ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात तालुक्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली. जवळपास दहा गावे पाण्याखाली गेली. या गावांचा संपर्कही तुटला होता. खेडोपाडी, तांडी, वस्तीवर जाणारे लहान-मोठे पूल रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था बंद पडली. तालुक्यातील नंदिनी, नानी नदीकाठच्या गावांना सर्वाधिक मोठा फटका बसला. वरील भागातून येणाऱ्या पाण्यामुळे नंदिनी, नानी नदीचे पात्र काठोकाठ भरून वाहत असताना, छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांचे येणारे पाणी सदर नदीमध्ये प्रवेश करू शकले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांचे पाणी आसपासच्या शिवारात पसरले. सात ते आठ दिवस या भागातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. त्यामुळे उडीद, सोयाबीन, कापूस, मूग, भुईमूग, कांदा, तूर, उसाचे नुकसान झाले.
अतिवृष्टीची शेवगाव मंडळामध्ये सर्वाधिक ११० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. अवघ्या काही दिवसांत पावसाने वर्षभराची सरासरी ओलांडली. आजवरच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पाऊस झाला. बहुतांश शेतीमधील खरिपाची पिके नष्ट झाली. बी-बियाणे, खते, औषधी व संपूर्ण मशागतीची मेहनत वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्याची गरज आहे. तालुक्यात ५२ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी झाली होती. महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून २ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. प्रत्यक्षात याहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
यामध्ये अनेक घरांची पडझड झाली. पुराच्या पाण्यामध्ये शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या, गाय, म्हैस, बैल ही जनावरे व शेती अवजारे, घरातील भांडीकुंडी वाहून गेली. घरात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने अनेकांना बेघर व्हावे लागले. अनेक कुटुंबे विखुरली गेली.
---
‘ती’ गावे सोडून अन्य गावांचे काय?
मंडळनिहाय पर्जन्यमापक यंत्रानुसार पावसाची नोंद होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. सर्वत्र कमी-जास्त पाऊस होतो. तालुक्यातील अनेक गावांत संततधार पाऊस, अतिवृष्टी झाली. परिणामी, अनेक ठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे मूळकुज होऊन त्याचा परिणाम निघणाऱ्या उत्पादनावर होईल. त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे कधी होणार, महसूल विभाग पंचनामे करण्याचे आदेश कधी देणार, त्यामुळे ‘ती’ बाधित गावे सोडून इतर गावांचे काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.