अकोलेतील अवैध धंदे थांबणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:12+5:302021-05-24T04:20:12+5:30
पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या पाच महिन्यांच्या कार्यकाळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अकोले पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी अडकल्याच्या ...
पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या पाच महिन्यांच्या कार्यकाळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अकोले पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी अडकल्याच्या घटना घडल्या. शिवाय लॉकडाऊनच्याही काळात पोलिसांचा विनाकारण फिरणाऱ्यांवर कोणताही अंकुश राहिलेला दिसत नव्हता. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय सुरूच होते. त्यामुळे परमार हे वादग्रस्त ठरले. जिल्ह्याचे पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी याबाबत शनिवारी आदेश काढला. अकोलेचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची यापूर्वीही नियुक्ती झाल्यानंतर पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला होता. यामुळे त्यांची अहमदनगर येथे नियंत्रण कक्ष येथे काही दिवसांतच बदली केली होती. मात्र पुन्हा त्यांना अकोले पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला.
मात्र अलीकडेच पोलीस नाईक संदीप पांडे याला ५ हजार रुपये घेताना पोलीस ठाण्याच्या आवारातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली होती. त्यास जबाबदार धरून परमार यांच्या तडकाफडकी बदलीचा आदेश जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांना काढावा लागला.
.......
घुगे यांच्याकडे कार्यभार
आता परमार यांच्या जागी अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्याकडे अकोले पोलीस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. आता घुगे यांच्यासमोर अवैध व्यवसाय बंद करण्याचे आव्हान आहे.