केडगावच्या पोलीस ठाण्याला मुहूर्त मिळणार का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 06:00 PM2018-04-14T18:00:40+5:302018-04-15T09:45:00+5:30
केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाने सारे राज्य हादरून गेले. नेहमीच संवेदनशील असणा-या केडगावचा चेहरा यामुळे समोर आला. राजकीय हाणामा-या येथे नवीन नाहीत. पण राजकीय संघर्ष थेट दिवसा ढवळ्या गोळीबारावर जाऊन पोहचला आहे. नगरचे मोठे उपनगर असूनही येथील कायदा-सुव्यस्थेचे सर्वत्र धिंडवडे निघाले. नगर शहराच्या वाढत्या विस्तारामुळे केडगावसह आसपासच्या काही गावांचे मिळून केडगावला स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव गेल्या १८ वर्षांपासून राजकीय व प्रशासकीय पाठपुराव्याभावी धूळखात पडून आहे.
योगेश गुंड
केडगाव : केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाने सारे राज्य हादरून गेले. नेहमीच संवेदनशील असणा-या केडगावचा चेहरा यामुळे समोर आला. राजकीय हाणामा-या येथे नवीन नाहीत. पण राजकीय संघर्ष थेट दिवसा ढवळ्या गोळीबारावर जाऊन पोहचला आहे. नगरचे मोठे उपनगर असूनही येथील कायदा-सुव्यस्थेचे सर्वत्र धिंडवडे निघाले. नगर शहराच्या वाढत्या विस्तारामुळे केडगावसह आसपासच्या काही गावांचे मिळून केडगावला स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव गेल्या १८ वर्षांपासून राजकीय व प्रशासकीय पाठपुराव्याभावी धूळखात पडून आहे.
केडगावचा वाढता पसारा, गुन्हेगारी,राजकीय संवेदनशीलता, अवैध धंद्याचा बोलबाला, राज्यमार्ग, बाह्यवळण रस्ता यामुळे केडगाव उपनगराला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा मिळणे आवश्यक असूनही हा प्रश्न वषार्नुवर्षे थिजत पडला आहे. सुमारे ८० हजार लोकवस्तीचे नगर शहराचे उपनगर असणारे केडगाव आता झपाट्याने विस्तारत आहे. सन २००० मध्ये केडगावसह आसपासची नगर तालुक्यातील गावे मिळून केडगावला स्वतंत्र पोलीस ठाणे मिळावे, असा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाने राज्य शासनाला पाठवला. याला आता १८ वर्षे लोटली आहेत. यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात आले. केडगावच्या प्रस्तावाची फक्त चर्चाच झाली. राजकीय पाठपुराव्याचा अभाव आणि प्रशासकीय पातळीवरील ढिलाई यामुळे अजूनही हा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडून आहे. सध्या केडगाव नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचा विस्तार वाढत असून जवळपास निम्मे शहर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट आहे. यामुळे कोतवाली पासून ५ किलोमीटर अंतरावर असणा-या केडगावमधील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मर्यादा येत आहेत. केडगाव मध्ये पोलीस चौकी असून तेथे चार-पाच पोलीस कर्मचा-याची नेमणूक आहे. यामुळे एवढ्या मोठ्या भागातील गुन्हेगारीवर वचक ठेवणे जिकीरीचे बनत आहे. राजकीयदृष्ट्या केडगाव नेहमी संवेदनशील म्हणून ओळखले जाते. निवडणुकीच्या काळात अनेक वेळा तणावाची स्थिती येथे पाहवयास मिळते. यातून अनेकदा हाणामारी झालेल्या आहेत. आताच घडलेले दुहेरी हत्याकांड हे ही याच कारणांनी घडल्याचे समोर येत आहे. या भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. राज्य मार्ग व बाह्यवळण रस्ता या परिसरातून जात असल्याने अपघात आणि रस्तालूट यांच्या गुन्ह्यांची आकडेवारी आता वाढू लागली आहे. यासर्व परिस्थितीमुळे केडगाव सारख्या उपनगरात स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात येणे आवश्यक असताना याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने हा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडत पडला आहे.
इतर उपनगरात पोलीस ठाणे केडगावात का नाही ?
नगर शहराच्या भिंगार, सावेडी, नागापूर या उपनगरात स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात आहे. मात्र केडगाव झपाट्याने वाढत असताना या उपनगराचा समावेश अजून शहरातील पोलीस ठाण्यात आहे. शहर व केडगाव मधील अंतर आणि शहराच्या पोलीस ठाण्याचा वाढता आवाका पाहता केडगावलासुध्दा इतर उपनगरांप्रमाणे स्वतंत्र पोलीस ठाणे असावे अशी मागणी होऊ लागली आहे.
म्हणून तरी पोलीस पोहचले लवकर
केडगावमध्ये ज्या दिवशी दुहेरी हत्याकांड झाले त्या दिवशी येथील पोटनिवडणुकीचा निकाल होता. यामुळे केडगाव पोलीस चौकीत बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची मोठी कुमक होती. यामुळे घटना घडल्यानंतर लगेच पोलीस घटनास्थळी पोहचले. अन्यथा नगर शहरातून पोलीस येण्यात बराच वेळ गेला असता.
प्रथमच केडगाव चौकित फिर्याद दाखल
केडगाव दुहेरी हत्याकांड झाल्यांनतर प्रथमच येथील पोलीस चौकीत फिर्याद दाखल करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा स्वत: उपस्थित होते. यापूर्वी फिर्याद देण्यास कोतवाली पोलीस ठाणे गाठावे लागायचे.