कुकडीचे एकच आवर्तन सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:27 AM2020-12-30T04:27:53+5:302020-12-30T04:27:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे असलेल्या डिंबे धरणात १२ टीएमसी पाणीसाठा आहे. मात्र डिंबेतील पाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे असलेल्या डिंबे धरणात १२ टीएमसी पाणीसाठा आहे. मात्र डिंबेतील पाणी येडगाव धरणात येण्यास अनंत डचणी आहेत. त्यामुळे येडगाव कालव्याखालील शेतकऱ्यांची अवघ्या एकच आवर्तनावर बोळवण होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कुकडीतील फळबागाउसाचे मळे जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
येडगाव १.८ टीएमसी, माणिकडोह ४.७ टीएमसी, डिंबे १२.५ टीएमसी, पिंपळगाव जोगे १.८ टीएमसी, घोड ४.१ टीएमसी, विसापूर ०.९ टीएमसी पाणीपाणी साठा शिल्लक आहे.
कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत शेतीसाठी कुकडीतून १ फेब्रुवारी तर घोड धरणामधून १० फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
घोड धरणातून तीन आवर्तने देण्यात येणार आहे. मात्र येडगाव व माणिकडोह धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याचा विचार केला तर येडगाव धरणातून नगर सोलापूरमधील शेतीसाठी एकच आवर्तन मिळणार अशी परिस्थिती आहे.
पिंपळगाव जोगे ५० टक्के भरले नाही. त्यामुळे डेड स्टाॅकमधील पाणी येडगावमध्ये सोडले जाणार नाही. डिंबेतील ६.२ टीएमसी हक्काचे पाणी कालव्याअभावी येडगावमध्ये येणे अवघड आहे. डिंबे, माणिकडोह बोगदा असता तर या वर्षी दोन पाणी शेतीला एक पाणी पिण्यास मिळाले असते ही वस्तुस्थिती आहे. पण शासन लोकप्रतिनिधींच्या नकारात्मक भूमिकेमुळे हा प्रश्न भिजत ठेवला आहे.
...
शेतकऱ्यांचे नुकसान
डिंबे, माणिकडोह बोगदा जोड प्रकल्प न झाल्याने यापुढे दरवर्षी नगर-सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सुमारे १ ते २ हजार कोटीचे नुकसान होणार आहे. परिणामी कुकडी, नागवडे, पारनेर, साईकृपा साखर कारखान्याचे गाळप हंगामावर अनिष्ट परिणाम होणार आहे.
....
शासनाने डिंबे, माणिकडोह बोगदा जोड प्रकल्पासाठी ३०० कोटीची तरतूद करणे आवश्यक आहे. यासाठी पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळामधील लोकप्रतिनिधींनी शासनावर दबाव आणण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीत नेते मंडळी कुकडीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधतात. तसा अजेंठा मांडतात. पण निवडणूक झाली कि बड्या नेत्यांच्या दबावाखाली राहतात. थेट काही बोलत नाही. त्यामुळे हा डिंबे माणिकडोह बोगदा जोड प्रकल्प होण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक होण्याची गरज आहे.-
राजेंद्र म्हस्के,
निमंत्रक, कुकडी-घोड पाटपाणी कृती समिती.