ऊस पेमेंटमधून वीज बिलासाठी रक्कम देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:38 AM2021-02-28T04:38:47+5:302021-02-28T04:38:47+5:30
श्रीरामपूर : राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीपंपाच्या वीजबिलाची थकबाकी भरण्यासाठी सवलत जाहीर केली आहे. याचा लाभ घेण्यासाठी अशोक सहकारी ...
श्रीरामपूर : राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीपंपाच्या वीजबिलाची थकबाकी भरण्यासाठी सवलत जाहीर केली आहे. याचा लाभ घेण्यासाठी अशोक सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांनी कारखान्यास संमती दिल्यास २०२०-२१ च्या गळीत हंगामातील उसाचे पेमेंटमधून रक्कम उपलब्ध करून दिली जाईल. तेवढ्याच रकमेची हमी देण्याचा निर्णय कारखाना प्रशासनाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ यांनी दिली.
शेतीपंपाचे वीज बिलाची रक्कम सप्टेंबर २०२० अखेरी गोठविण्यात आली आहे. शेती पंपाच्या थकीत वीज बिलाची रक्कम मार्च २०२२ पर्यंत भरल्यास थकबाकीच्या रकमेत ५० टक्के, मार्च २०२३ पर्यंत भरल्यास ३० टक्के आणि मार्च २०२४ पर्यंत भरल्यास २० टक्के अशी सूट दिली जाणार आहे.
कारखान्याचे सभासद, शेतकरी २०२० पासूनची चालू वीज बिलाची देय रक्कम ३१ मार्च २०२१ अखेरपर्यंत भरतील, त्यांनाच या सवलतीचा व धोरणाचा लाभ मिळणार आहे.
कारखाना प्रशासनाने जे शेतकरी संमती देतील, त्यांना २०२०-२१ च्या गळितास आलेल्या ऊस पेमेंटमधून जेवढी रक्कम उपलब्ध होईल, तेवढ्या उपलब्ध रकमेचे हमीपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण कंपनीने कारखान्याचे हमीपत्र स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. या धोरणाचा लाभ घेण्यासाठी कारखान्याच्या अकौंट विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कहांडळ व संचालकांनी केले आहे.