Ramdas Athawale: रामदास आठवले लोकसभा निवडणुक लढवणार? म्हणाले, शिर्डीतून लढायचंय, पण पडायचं नाही
By साहेबराव नरसाळे | Published: August 18, 2022 06:08 PM2022-08-18T18:08:20+5:302022-08-18T18:26:07+5:30
Ramdas Athawale: " २००९ साली शिर्डीत विखेंचा पाठिंबा मिळाला असता तर तेव्हा आपण पडलोच नसतो. आता शिर्डीतून पुन्हा लढायचं आहे, पण पडायचं नाही, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीच्या जागेवर आपला हक्क सांगितला.
अहमदनगर - २००९ साली शिर्डीत विखेंचा पाठिंबा मिळाला असता तर तेव्हा आपण पडलोच नसतो. आता शिर्डीतून पुन्हा लढायचं आहे, पण पडायचं नाही, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीच्या जागेवर आपला हक्क सांगितला.
आठवले हे गुरुवारी (दि. १८) अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिर्डीतून पुन्हा लढण्याची आपली इच्छा आहे. पण आता पडायचं नाही. २००९ साली बाळासाहेब विखे यांना दक्षिणेतून लढायचं होतं. पण राष्ट्रवादीने त्यांना जागा सोडली नाही. त्यामुळे विखे यांनी शिर्डीत आपल्याला पाठिंबा दिला नाही. त्यांनी पाठिंबा दिला असता तर त्याचवेळी आपण पडलो नसतो. पण आता चित्र वेगळं आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील शिवसेनेतील वादावर बोलताना आठवले म्हणाले, एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे. त्यांना ४० आमदार, १२ खासदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे धनुष्यबाणाचे चिन्हही त्यांनाच मिळायला हवे. सर्वोच्च न्यायालयातून त्यांना न्याय मिळेल, असा आशावाद आठवले यांनी व्यक्त केला.
मेटे यांच्या अपघाताबाबत संशय
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी मराठा समाजाचा आवाज बुलंद केला. मराठा आरक्षणासाठी त्यांनी संघर्ष केला. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी जात असताना त्यांच्या गाडीला अपघात होऊन त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे. या अपघाताची सीआयडी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे आठवडले म्हणाले.
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी
राजस्थानात एका शाळकरी मुलाला पाणी पिण्याच्या कारणावरुन शिक्षकाने बेदम मारहाण केली. यात त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्या शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी. राजस्थानात दलितांवर अत्याचार वाढत असूनही मुख्यमंत्री राजस्थानात इतर राज्यांच्या तुलनेत दलितांवर अत्याचार होत नाहीत, असे सांगतात. त्यांचे विधान अत्यंत खेदजनक आहे. त्यांनी दलित समाजाची माफी मागावी, असे आठवले म्हणाले.
नितीशकुमार पुन्हा भाजपसोबत येतील
बिहारमध्ये झालेल्या सत्तांतराबाबत आठवले म्हणाले, नितीशकुमार यांनी यापूर्वी लालूप्रसाद यांना धोका दिलेला आहे. नितीशकुमार यांच्या पक्षाने कमी जागा जिंकूनही भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. मात्र, त्यांनी भाजपला धोका देऊन पुन्हा लालूप्रसाद यांच्या आरजेडीसोबत युती केली आहे. दोन वर्षात ते आरडीजेडीला धोका देतील व भाजपसोबत येतील. नितीशकुमार यांना धोका देण्याची जुनीच सवय आहे.
लोकशाही नव्हे, घोटाळेबाज धोक्यात
ईडीकडून होत असलेल्या कारवायांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आठवले म्हणाले, ईडी ज्यांच्याविरोधात पुरावे सापडत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई होत आहे. यात भाजपचा काडीचाही संबंध नाही. इथे लोकशाही धोक्यात असल्याची आवई उठवली जात आहे. पण लोकशाही धोक्यात नाही तर घोटाळेबाज धोक्यात आहेत