पोलीस स्टेशनमध्ये जप्त केलेली वाहने सोडणार; वाहन मालकांची ठाण्यात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 03:08 PM2020-05-20T15:08:27+5:302020-05-20T15:09:17+5:30
लॉकडाऊनच्या काळात नगर शहरात पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने सोडण्याचा निर्णय अखेर मंगळवारी पोलीस प्रशासनाने घेतला. कागदपत्रांची पडताळणी करून मालकांना ही वाहने पोलीस स्टेशनमधून दिली जात आहेत. वाहने घेण्यासाठी मंगळवारी सकाळपासून शहरातील तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात वाहन मालकांनी गर्दी केली होती.
अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात नगर शहरात पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने सोडण्याचा निर्णय अखेर मंगळवारी पोलीस प्रशासनाने घेतला. कागदपत्रांची पडताळणी करून मालकांना ही वाहने पोलीस स्टेशनमधून दिली जात आहेत. वाहने घेण्यासाठी मंगळवारी सकाळपासून शहरातील तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात वाहन मालकांनी गर्दी केली होती.
पोलिसांनी फिजीकल डिस्टन्ससिंगचा नियम पाळून ही वाहने परत केली. लॉकडाऊनच्या काळात वाहने घेऊन रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. अनेक नागरिक मात्र विनाकारण वाहने घेऊन फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी ही वाहने जप्त करीत बहुतांशी वाहन चालकाविरोधात शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. नगर शहरात बाराशेपेक्षा जास्त तर संपूर्ण जिल्ह्यात साडेचार हजार वाहने लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी जप्त केले आहेत. यातील बहुतांशी वाहने गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस स्टेशनमध्ये अडकून पडली होती. पोलिसांनी मंगळवारपासुन कागदपत्रांची पडताळणी करून वाहने परत देण्यास सुरुवात केली. ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही अथवा इतर कागदपत्राची पूर्तता नाही अशा चालकांकडून दंड आकारण्यात येणार आहे. ज्या वाहन चालकाविरोधात कलम १८८ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्याबाबत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जाणार आहे. त्यानंतर नियम भंग करणाºया वाहन चालकांकडून न्यायालयाच्या आदेशानुसार दंड आकारला जाणार आहे.