कर्जत-जामखेडच्या जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:22 AM2021-09-11T04:22:23+5:302021-09-11T04:22:23+5:30
कर्जत/जामखेड : मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना नगर जिल्ह्यापासून सुरू करणार आहोत. त्याचा फायदा जलसंवर्धनासाठी होणार आहे. कर्जत-जामखेड तालुक्यातील जुने विविध ...
कर्जत/जामखेड : मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना नगर जिल्ह्यापासून सुरू करणार आहोत. त्याचा फायदा जलसंवर्धनासाठी होणार आहे. कर्जत-जामखेड तालुक्यातील जुने विविध बंधारे दुरुस्ती, खोलीकरणासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
शुक्रवारी (दि. १०) गडाख यांनी जामखेड तालुक्यात बावी, जवळा, कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू, शिंदे, कोंभळी या गावांमध्ये तालुक्यातील शिवसैनिक, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिवसंवाद घोंगडी बैठका घेतल्या. यावेळी ते बोलत होते.
गडाख म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शिवसेना बळकट करायची आहे. घराघरांत शिवसैनिकांची नोंदणी करून पक्षाची ध्येयधोरणे गावागावात, वाड्यावस्त्यांवर पोहोचवायची आहेत. त्यासाठी आपण सर्व मिळून काम करू. शिवसैनिकांसह नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी समन्वयातून काम करून जनतेचे प्रश्न सोडवावीत. शिवसेना पक्षवाढीबाबत कधीही संपर्क करा मी सदैव आपल्यासाठी उपलब्ध आहे, अशी ग्वाही गडाख यांनी यावेळी दिली.
ठिकठिकाणी शिवसैनिकांनी गडाख यांचे स्वागत केले.
याप्रसंगी दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जामखेड तालुकाध्यक्ष संजय काशीद, कर्जत तालुकाध्यक्ष नीलेश पवार, सावता हजारे, चंद्रकांत घालमे, दीपक गांगर्डे, उपसरपंच दादा मंडलिक, विश्वनाथ राऊत, प्रशांत शिंदे, दयानंद कतले, राजेंद्र राऊत, गणेश काळे, किरण हजारे आदींसह जामखेड, कर्जत तालुक्यातील शिवसैनिक, शाखाप्रमुख, विविध पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी आदी उपस्थित होते.
गडाखांच्या दौऱ्याने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य
मंत्री शंकरराव गडाख यांनी कर्जत व जामखेड तालुक्यातील विविध गावात शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यांचे स्थानिक पातळीवरील प्रश्न जाणून घेतले. त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे दाेन्ही तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. याचा उपयोग शिवसेना संघटन वाढीसाठी होणार आहे, अशी माहिती दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र राऊत यांनी दिली.
---
१० गडाख
मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी जामखेड तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी गावागावात जाऊन चर्चा केली.