अखेरच्या श्वासापर्यंत काळ्या आईची सेवा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:21 AM2021-02-16T04:21:56+5:302021-02-16T04:21:56+5:30

कोपरगाव : काळी आई आपली आई असून, तिला जपणे आपले कर्तव्य आहे. देशी बियाणांची बॅंक गावोगाव तयार होणे गरजेचे ...

Will serve the black mother until the last breath | अखेरच्या श्वासापर्यंत काळ्या आईची सेवा करणार

अखेरच्या श्वासापर्यंत काळ्या आईची सेवा करणार

कोपरगाव : काळी आई आपली आई असून, तिला जपणे आपले कर्तव्य आहे. देशी बियाणांची बॅंक गावोगाव तयार होणे गरजेचे आहे. हे बियाणे कमी पाण्यावर येत असून, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर बियाणे पोहोचले पाहिजे. आजपर्यंत मिळालेले पुरस्कार हे माझे नसून ते काळ्या आईचे आहे. शेवटच्या अखेरच्या श्वासापर्यंत काळ्या आईची सेवा करत राहणार आहे, असे प्रतिपादन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील बहाहरपूर येथे समाजसेवक भाऊसाहेब रहाणे यांच्या स्मरणार्थ स्नेहप्रेम संस्थेच्या माध्यमातून अनाथांचे पुनर्वसन करणारे फारुक बेग व मनोरुग्णासाठी काम करणाऱ्या सुलक्षणा आहेर यांना रविवारी (दि.१४) पुरस्कार वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी पोपेरे बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी आशा हासे होत्या. यावेळी स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी, रुख्मिणी रहाणे, शिवाजी रहाणे, संदीप रोहमारे, सरपंच सुनीता रहाणे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे, कैलास रहाणे, रामदास रहाणे, प्रा. शीला गाढे यांची प्रमुख उपस्थित होती.

पोपरे म्हणाल्या, तरुणांच्या आहारात देशी व विना केमिकलचे अन्न गेले, तर आजपेक्षाही ते जास्त हुशार होतील आणि निरोगी राहतील. समाजात करण्याची पहिल्यापासून काम करण्याची इच्छा होती. शाळा शिकले नाही. पण घरी वडील लहानपणी आठ दिवसांतून ज्ञानाच्या गोष्टीवर चर्चा करायचे, त्या आठवणीत ठेवून त्या ज्ञानाचा वापर करता आला. एक-एक शब्द डोक्यात साठवून ठेवला तेच आज जगासमोर मांडत आहे. देशी बियाणे ही काळाची गरज आहे. पुढील पिढी सदृढ राहण्यासाठी विषमुक्त अन्नाची गरज आहे, असे सांगत झाडे जगविणे, मुली वाचविणे व देशी बियांणांचा वापर या त्रिसूत्रीचे पोपेरे यांनी महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन सुभाष रहाणे यांनी केले.

Web Title: Will serve the black mother until the last breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.