कर्जत-जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणार; पैलवानांची चेष्टा व्हायला नको - रोहित पवार

By सुदाम देशमुख | Updated: February 3, 2025 23:20 IST2025-02-03T23:20:20+5:302025-02-03T23:20:27+5:30

मार्चअखेर कर्जत-जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करणार - रोहित पवार

Will try to organize Maharashtra Kesari competition in Karjat Jamkhed by the end of March says Rohit Pawar | कर्जत-जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणार; पैलवानांची चेष्टा व्हायला नको - रोहित पवार

कर्जत-जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणार; पैलवानांची चेष्टा व्हायला नको - रोहित पवार

अहिल्यानगर : वादाचं ‘मोहोळ’ उठलेली अहिल्यानगरमधील कालची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी, असा प्रश्न निर्माण होतो. या स्पर्धेतील काही नियम अजब-गजबच होते, अनेक मल्लांना संधीही मिळाली नाही, त्यामुळे आपण मार्चअखेर कर्जत-जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

पवार म्हणाले, माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मानसन्मान न मिळाल्याने त्यांना अवमान सहन करावा लागला. केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवर छाप असल्याने या नेत्यांसाठी अनेक कुस्त्यांच्या वेळाही बदलल्या. एकूणच काय तर ही स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांनी चेष्टा करणारी होती, अशी खंत व्यक्त केली.

कुस्तीतील पारदर्शकता, आदरभाव, निष्पक्षपणा आणि खिलाडूवृत्तीच काल ‘चितपट’ झाल्याचे चित्र दुर्दैवाने अवघ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी बघावे लागले. म्हणूनच पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ अन्यायाला थारा न देणाऱ्या माझ्या मतदारसंघात कर्जत-जामखेडच्या पवित्र भूमीत घेण्याचे नियोजन आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे’ने परवानगी दिली, तर पुढील महिन्यातच मार्चअखेर ‘महाराष्ट्र केसरी’चा कर्जत-जामखेडच्या भूमीत भव्य आखाडा भरवण्यात येईल. ही स्पर्धा ‘कुणालातरी जिंकवण्यासाठी’ नसेल तर या स्पर्धेत गुणवत्तेवर जिंकणाऱ्या पैलवानालाच मानाची गदा मिळेल, याची खात्री देतो, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
 

Web Title: Will try to organize Maharashtra Kesari competition in Karjat Jamkhed by the end of March says Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.