विलसन चले जाव..??

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:24 AM2021-08-22T04:24:06+5:302021-08-22T04:24:06+5:30

एक म्हणजे अकोले तालुक्याचे विभाजन, दुसरी म्हणजे आदिवासी-बिगरआदिवासी असा वाद लावू नका. पृथ्वीच्या जन्मापासूनचे सहजीवन आहे, त्याला धक्का लावू ...

Wilson go away .. ?? | विलसन चले जाव..??

विलसन चले जाव..??

एक म्हणजे अकोले तालुक्याचे विभाजन, दुसरी म्हणजे आदिवासी-बिगरआदिवासी असा वाद लावू नका. पृथ्वीच्या जन्मापासूनचे सहजीवन आहे, त्याला धक्का लावू नका. कोणीतरी बहुजन बहुजन म्हणतोय, तूप-रोटी खातोय. भाऊ! बहुजनात कोळी येत नाहीत, हे तू कोणत्या शब्दकोशात वाचले? त्यात काय बहुजन म्हणजे केवळ मराठा? दुसरा म्हणतो, शिवाजी राजांचे नाव फ्लेक्सवर नको? भाऊ! शिवाजी काय केवळ मराठ्यांचा राजा होता? नकाे असं बोलायला. तुम्ही हुशार आहात, आम्हा गरिबांची शपत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भंडारदरा धरणाचे नामांतरण!

होय ! राघोजी भांगरे हे आदिवासींची अस्मिताच. त्या पवित्र अस्मितेचं राजकारण नको करायला. राघोजी अन्यायाविरुद्ध लढले. मला त्या वीराचा प्रचंड अभिमान आहे. शिवाजीराजांच्या बंडखोर वारसदारांपैकी एक राघोजी भांगरे. त्यावर मी पुस्तक लिहिलंय. त्या जाज्वल्य इतिहासाचा खेळ करायचे काम चालवलंय. राघोजी यांच्या विचारांचा प्रसार करायचे काम करताना कोणी कधीच दिसले नाहीत. तिकडे टोकियो - न्यूयॉर्कच्या, ठाण्याच्या रस्त्यांना नावे देता. यांनी आतापर्यंत स्वतःच्या गावात एखाद्या रस्त्याला का नाही दिले नाव? जुगार, दारू अड्डा चालवणाऱ्या अकोले स्टॅन्डकडे बोट करता? नका करू असं काही.

करायचे असेल तर एक करा, घटनेतील पाचव्या शेड्युलला सुरुंग लावण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे आदिवासींना मिळालेल्या मूलभूत हक्कांमध्ये मोठे बदल होत आहेत. तिकडे लक्ष द्या. अस्मितेच्या राजकारणाकडे नको.

विषयांतर होतंय....

मला मुख्य भंडारदरा धरणाबाबत काही म्हणायचंय. वेरूळ-अजिंठाच्या नामांतराचे आजपर्यंत जगात कोणाच्या मनात आले असे ऐकिवात नाही. तीच गोष्ट भंडारदरा धरणाची. तो केवळ एक पाणीसाठा नसून धरणाच्या जागेचे स्वर्गीय असे मूर्तिमंत उदाहरण आहे. ते एक नैसर्गिक शिल्पच आहे! पुरातन निसर्गाला पडलेले ते स्वप्न आहे! डोंगरदऱ्यातून त्यात झेपावलेले पाणी इतके विशुद्ध आहे, की कालपर्यंत कोणाची दृष्ट त्याला लागली नव्हती. काल ती लागली. दुर्दैव! नावात काय आहे? यावर अनेक चर्चा झडून गेल्यात. धरणाचे कागदोपत्री नाव विल्सन डॅम आहे. हे तरी किती लोकांना माहीत आहे? अन्य नाव दिले तरी तेच होईल कारण त्याच्या कपाळावर सटवीने भंडारदरा असेच लिहून ठेवले आहे. आज धरणाचे नाव बदलणार! उद्या डोंगरांची नावेही बदलणार! डोंगर कमी पडतील, तेव्हा पावसाला ही नावे दिली जातील. शेंडीवर पडणारा पाऊस... रेन फॉल, राजुरचा ....रेन फॉल, मग रतनगडाचे नामांतर ओघाने आलेच. हरिश्चंद्रगडाच्या नामांतरावरून तर महायुद्ध होईल..!

ताजमहालाला अन्य नाव देणे जितके हास्यास्पद तितकेच भंडारदऱ्याला. जेव्हा मूलभूत प्रश्नांचे मुद्दे संपतात, तेव्हा अशा अस्मितेचे राजकारण सुचते. सत्तरच्या दशकात भंडारदरा गंभीर आजारी पडला होता. तो उखडून फेकून चार-पाच वर्षात दुसरा उभा करणे सहज शक्य होते. पण तत्कालीन धुरीणांनी, द्रष्ट्यांनी तो असा काही दुरुस्त केला की त्याच्या मूळ ढाच्याला केसाइतकाही धक्का लागू नये. वा!! सलाम त्या पूर्वजांना! आणि आजचे हे धुरीण! गेल्या वीस वर्षात या भंडारदऱ्याची धूळधाण केली. अवकळा पसरली. अरे बाबांनो कोणी कालिदास तिथे येतो तर आणखी एक मेघदूत तिथे जन्मते! इतके ते सौंदर्य! ती सौंदर्य संपन्नता! शंभर वर्षांपूर्वी तो जन्मलाय. राहू द्या ना त्याला तसाच. कशाला छेडछाड करता त्याच्या नावाशी, का गावाशी! एक पुढारी मला तिरकसपणे म्हणाला, काय हो नामांतरण केल्याने पाण्याचा रंग बदलणार आहे काय? मी म्हणालो, इतके ही तुला समजत नसेल तर खुशाल कर. कळसुबाईला तुझ्या आजोबाचे नाव तर रंधा फॉलला तुझ्या पित्याचे नाव दे. या झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे कसे करायचे? खुशाल म्हणा, विल्सन चले जाव... त्याचे त्यांना लख लाभ होवो. इडा पीडा जावो आणि कळसुबाईचे राज्य येवो.!

- शांताराम गजे

Web Title: Wilson go away .. ??

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.