नगर तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:20 AM2021-04-15T04:20:42+5:302021-04-15T04:20:42+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील बहुतांशी गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे. सध्या कांदा काढणीची कामे सुरू असून, दररोजच्या अवकाळी ...
केडगाव : नगर तालुक्यातील बहुतांशी गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे. सध्या कांदा काढणीची कामे सुरू असून, दररोजच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. काही शेतकऱ्यांची कांदा झाकण्यासाठी धांदल उडत आहे.
मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने भूगर्भातील पाणीपातळी वाढली. यंदा पाणीटंचाई निर्माण होणार नसल्याचा अंदाज बांधत नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली आहे. मात्र, यावर्षी वातावरणात होणारे बदल अन् रोगराई थांबण्याचे नावच घेत नसल्याचे दिसते. कांदा लागवडीपासूनच या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. कांदा काढणीला आला तरी वातावरण शेतकऱ्यांना साथ देत नाही. त्यातच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रंग दाखवायला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. तालुक्यात सर्वच भागांत कांदा काढणीचे काम सुरू आहे. काढलेला कांदा गोळा करून शेतातच ठेवलेला आहे. वादळी वारे व अवकाळी पावसाचा अंदाज दिसला की, कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होताना दिसते.
अवकाळी पावसाने चारा पिकांचे नुकसान होत आहे. कडवळ, मका भुईसपाट होत आहे. तालुक्यात बहुतांशी भागात गव्हाचे खळे झाले आहे. गव्हाचा भुसा शेतातच पडलेला आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी भुशाचा वापर केला जातो. पावसाने भुसा भिजू नये यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.
--
कांदा लागवडीसाठी महागडे बी टाकून रोपे तयार केली. मात्र, सततच्या पावसाने कांदा रोपे जागेवर सडली. त्यामुळे महागडी रोपे व बियाणे घेऊन कांदा लागवड केली. सुरुवातीपासून वातावरणात बदल होताना पिकांवर काढणीपर्यंत महागडी औषधे फवारणी करावी लागली. सध्या काढणी केलेल्या कांद्याला अवकाळीने तडाखा दिला आहे. शेतकऱ्यांवर निसर्ग संकटाची मालिका आताही चालूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
-तुकाराम लांडगे,
शेतकरी, सारोळा बद्धी
--
१४ नगर तालुका पाऊस
अवकाळी पावसामुळे काढणी झालेला कांदा झाकण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत.