बिनतारी संदेश यंत्रणेचे साहित्य चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:22 AM2021-02-16T04:22:56+5:302021-02-16T04:22:56+5:30
सोमवारी (दि. १५) पहाटेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जवळे येथील बाळेश्वर मंदिर परिसरात असलेल्या बिनतारी संदेश केंद्रातून चोरट्यांनी ...
सोमवारी (दि. १५) पहाटेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जवळे येथील बाळेश्वर मंदिर परिसरात असलेल्या बिनतारी संदेश केंद्रातून चोरट्यांनी साहित्य चोरले. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्यांचे चित्रीकरण मंदिर परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
पोलीस मुख्यालयातील पोलीस कॉस्टेबल उल्हास बाबुराव बढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संगमनेर तालुक्याच्या पठारभागात जवळे बाळेश्वर मंदिर परिसराजवळ पोलीस विभागाची बिनतारी संदेश यंत्रणा आहे. चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून परिसरात प्रवेश केला. मंदिरातील दानपेटी फोडत त्यातील पैसे चोरले. त्यानंतर बिनतारी संदेश यंत्रणा असलेल्या केंद्राचे कुलूप तोडले. आत प्रवेश करत चोरट्यांनी रिपिटर, तीन बॅटरी चार्जर व इतर साहित्य असा एकूण ३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून नुकसान केले.
याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक डी. पी. राऊत, अहमदनगरच्या बिनतारी संदेश विभागाचे उपनिरीक्षक डी. बी. ताम्हाणे हे घटनास्थळी पोहोचले. नाशिक येथील बिनतारी संदेश विभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेलार, संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे देखील तेथे पोहाचले. श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक राऊत या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
फोटो १५ चोरी
ओळी- जवळे येथील बिनतारी संदेश केंद्रातून चोरट्यांनी साहित्य चोरून नेले.