मागणीअभावी ११ लाख मेट्रिक टन साखर पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 05:31 PM2019-07-11T17:31:42+5:302019-07-11T17:32:27+5:30
बाजारातील साखरेची मागणी घटल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे़
अण्णा नवथर
अहमदनगर : बाजारातील साखरेची मागणी घटल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे़ साखरेला उठाव नसल्याने जिल्ह्यातील २८ सहकारी साखर कारखान्यांच्या गोदामात ११ लाख २३ हजार मेट्रिक टन साखर पडून आहे़ त्यामुळे जिल्हा बँकेकडून घेतलेली उचल परत करणे कारखान्यांना कठीण झाले आहे़
मागीलवर्षीच्या गाळप हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १६ लाख ३३ हजार ५५४ मेट्रिक टन साखर उत्पादन झाले़ गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांकडे ४ लाख ३० हजार मेट्रिक टन साखर शिल्लक होती़ दोन्ही हंगामाची एकूण २० लाख ६४ हजार मेट्रिक टन साखर कारखान्यांकडे विक्रीसाठी होती़ केंद्र शासनाच्या नियमानुसार साखर कारखान्यांकडून साखर विक्रीसाठी रीतसर निविदा मागविण्यात आल्या़ मात्र बाजारात साखरेला मागणी नव्हती़ आॅक्टोबर २०१८ ते ३० जून २०१९, या नऊ महिन्यांत केवळ ९ लाख ४० हजार ७८७ मेट्रिक टन साखर विकली गेली़
उर्वरित ११ लाख २३ हजार ४९२ मेट्रिक टन साखर गोदांमामध्ये पडून आहे़ साखरेचे अतिरिक्त उत्पादन आणि घटलेली मागणी, यामुळे गेल्या हंगामातील साखर साठवून ठेवण्याची वेळ साखर कारखान्यांवर ओढावली आहे़
साखरेवर प्रति क्विंटलवर जिल्हा बँकेकडून कारखान्यांना ८५ टक्के उचल कर्ज रुपाने मिळते़ जिल्ह्यातील कारखान्यांनी जिल्हा बँकेकडून उचल घेतली़ मात्र गेल्या नऊ महिन्यांमध्ये साखरेला उठाव नाही़ त्यामुळे जिल्हा बँकेकडून घेतले कर्ज परत करणे कारखान्यांना शक्य झाले नाही़ बँकेचे कर्ज कारखान्यांच्या डोईजड झाले आहे़
सभासदांना एफारपीप्रमाणे दर कारखान्यांनी दिला़ कारखान्यांनी कर्ज घेऊन शेतकऱ्यांचे पैसे दिले़ मात्र आता मागणी नसल्यामुळे साखर पडून आहे़ अतिरिक्त साठविण्यावर कारखान्यांचा खर्च होत असून, अतिरिक्त साखर कारखान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे़
साखरेला बाजारात उठाव नाही़ त्यामुळे आधीच अडचणीत असलेले जिल्ह्यातील साखर कारखान्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे़ त्यामुळे कारखान्यांना घेतलेले कर्ज परत करणे शक्य नाही़ त्यावरील व्याजाची रक्कम वाढत आहे़ -सीताराम गायकर, अध्यक्ष, जिल्हा सहकारी बँक