शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर झालेल्या दंगलीवरुन शिवसैनिकांवर लावलेले ३०८ कलम मागे घ्या- मंत्री शिंदे यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:17 PM2018-04-16T12:17:50+5:302018-04-16T12:20:46+5:30
केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली़ त्यानंतर शिवसैनिकांनी भावना व्यक्त केली. त्यात चूक काय, असा सवाल करीत पोलिसांनी शिवसैनिकांवर लावलेले ३०८ कलम पोलिसांनी मागे घ्यावे अशी मागणी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
अहमदनगर : केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी भावना व्यक्त केली. त्यात चूक काय, असा सवाल करीत पोलिसांनी शिवसैनिकांवर लावलेले ३०८ कलम पोलिसांनी मागे घ्यावे अशी मागणी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
केडगाव येथील दुहेरी हत्याकांडात मयत झालेले संजय कोतकर व वसंत ठुबे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे, माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री शिंदे म्हणाले, केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिका-यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी केडगाव येथे भावना व्यक्त केल्या. ती दंगल नव्हती, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांचे समर्थन केले. तसेच पोलिसांनी शिवसेनेच्या पदाधिका-यांवर लावलेले ३०८ चे कलम मागे घ्यावे अशी मागणी केली़ काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा यांच्या संगनमताने शिवसैनिकांची हत्या झाली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, पीडित कुटुंबाच्या मागे सेना खंबिरपणे उभी आहे. पोलिसांनी हत्येच्या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या सर्वांचे कॉल डिटेल्स तपासावेत, असेही एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले.