कर्मचाऱ्यांच्या आक्षेपानंतर ‘त्या’ घटस्फोटितांची बदलीतून माघार

By चंद्रकांत शेळके | Published: May 12, 2023 08:50 PM2023-05-12T20:50:14+5:302023-05-12T20:51:04+5:30

शुक्रवारी आरोग्य विभागाच्या बदल्यांत ६ महिलांच्या संशयित घटस्फोटिता प्रमाणपत्रांवर इतर सहकारी कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने त्यांनी बदलीतून माघार घेतली.

Withdrawal of those divorcees from transfer after objection from employees | कर्मचाऱ्यांच्या आक्षेपानंतर ‘त्या’ घटस्फोटितांची बदलीतून माघार

कर्मचाऱ्यांच्या आक्षेपानंतर ‘त्या’ घटस्फोटितांची बदलीतून माघार

अहमदनगर : बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा घटस्फोटिता असल्याचे खोटे कागदपत्र देऊन बदलीत सूट मिळवण्याचा प्रयत्न करणारे अनेक कर्मचारी सीईओंच्या कडक इशाऱ्याने उघडे पडत आहेत. शुक्रवारी आरोग्य विभागाच्या बदल्यांत ६ महिलांच्या संशयित घटस्फोटिता प्रमाणपत्रांवर इतर सहकारी कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने त्यांनी बदलीतून माघार घेतली. अखेर त्यांची प्रशासकीय बदली करण्यात आली. त्यावरून ही प्रमाणपत्रे बोगस असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच त्या कर्मचाऱ्यांनी दिल्याचे समोर आले.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. या बदल्यांत सूट मिळावी म्हणून अनेक कर्मचारी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करत असल्याची बाब ‘लोकमत’ने निदर्शनास आणली होती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी बदल्यांमध्ये कोणी बनावट प्रमाणपत्र सादर केले असल्यास ते मागे घ्यावे, असे आवाहन केले. वैद्यकीय प्रमाणपत्रांची वैद्यकीय मंडळामार्फत तपासणी होणार आहे. त्यात प्रमाणपत्र बनावट निघाले तर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा कडक इशारा त्यांनी दिला. त्यामुळे धास्तावलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांत आपली प्रमाणपत्रे मागे घेतली.

शुक्रवारी आरोग्य विभागाच्या बदल्या होत्या. आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची चर्चा आधीपासूनच या कर्मचाऱ्यांमध्ये होती. दुपारी जेव्हा बदल्यांची फेरी सुरू झाली तेव्हा सीईओ येरेकर यांनी पुन्हा एकदा सभागृहात बोगस प्रमाणपत्राविषयी सूचना दिली. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आपला निर्णय बदलला. प्रारंभी पेसातील प्रशासकीय बदल्या झाल्या. यात दोन महिलांकडे प्रमाणपत्राची सूट असतानाही त्यांंनी पेसातील बदली स्वीकारली. त्यानंतर एका घटस्फोटित महिलेने आपल्याला प्रशासकीय बदलीतून सूट मिळावी, असे सांगताच इतर आरोग्यसेविकांनी ही घटस्फोटिता नाहीच. हिला बदलीत सूट देऊ नये, असा थेट आक्षेप घेतला. आपली चोरी पकडली गेल्याने या महिलेने गुपचूप प्रशासन जे ठिकाण देईल ती प्रशासकीय बदली घेतली. सहा महिला अशा बोगस घटस्फोटित प्रमाणपत्रावर सूट घेताना आढळल्या. इतर महिलांनी आक्षेप घेतल्याने त्यांना प्रशासकीय बदली घ्यावी लागली. हा सर्व प्रकार पाहून येरेकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.

येरेकर यांच्या भूमिकेचे टाळ्या वाजवून स्वागत
बदली करताना प्रशासन शक्य तेवढी तुमची सोय करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु असे असतानाही अनेक कर्मचारी गैरप्रकार करून बदल्यांत सूट मिळवत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आहेत. त्यातून प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो. त्यामुळे कोणी बोगसपणा करून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तर बडतर्फ केल्याशिवाय सोडणार नाही, अशी तंबी सीईओ येरेकर यांनी सभागृहात देताच प्रामाणिक आरोग्यसेविकांनी टाळ्या वाजवून या भूमिकेचे स्वागत केले.
 

Web Title: Withdrawal of those divorcees from transfer after objection from employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.