दोन महिन्यात पंधरा महिलांचे दागिने ओरबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 11:04 AM2018-10-04T11:04:02+5:302018-10-04T11:08:50+5:30
नगर जिल्ह्यातील मोठमोठे गुन्हेगार व गँगस्टर पोलिसांनी गजाआड केले असले तरी भुरट्या चोरट्यांनी मात्र उच्छाद मांडला आहे.
अहमदनगर: नगर जिल्ह्यातील मोठमोठे गुन्हेगार व गँगस्टर पोलिसांनी गजाआड केले असले तरी भुरट्या चोरट्यांनी मात्र उच्छाद मांडला आहे. गेल्या दोन महिन्यांत नगर शहरात चोरट्यांनी धूमस्टाईलने पंधरा महिलांचे दागिने ओरबाडले आहेत. विशेष म्हणजे यातील एकही आरोपी पकडला गेला नाही.
शहरात मध्यंतरी एक ते दीड वर्षे बंद झालेल्या धूमस्टाईल चोऱ्या पुन्हा सुरू झाल्या आहेत़ पायी जाणा-या एकट्या महिलेला हेरून चोरटे दुचाकीवरून येऊन गळ्यातील दागिने ओरबाडून पसार होत आहेत. चोरटे जेव्हा महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडतात तेव्हा अनेक महिला खाली पडून जखमी झाल्या आहेत. तर काहींच्या गळ्याला दुखापत झाली आहे. भरदिवसा या चो-या होत असल्याने महिलांमध्ये घबराट पसरली आहे. गेल्या दोन महिन्यात शहरातील कापड बाजार परिसर, रेल्वेस्टेशन, नागापूर, बुरूडगाव रोड, भिंगार, कल्याण रोड, माळीवाडा बसस्थानक, लिंक रोड आदी ठिकाणी या धूमस्टाईल चो-या झाल्या आहेत. धूमस्टाईल चो-यांसह शहरातील पुणे बसस्थानक व माळीवाडा बसस्थानक येथेही महिलांचे दागिने चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. महिलांच्या पर्स चोरणा-या व धूमस्टाईल चो-या करणा-या टोळ्या या नगर शहर व परिसरातीलच असतानाही पोलिसांना त्यांना पकडणे शक्य होईना.
एकाच दिवशी दोन महिलांचे दागिने चोरले
शहरातील एकविरा चौक परिसरात किराणा दुकानात सामान खरेदीसाठी आलेल्या महिलेचे दोघा चोरट्यांनी धूमस्टाईलने ४५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले़ मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शकुंतला म्हातारदेव खाडे (वय ५३) यांनी फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शहरातील मंगलगेट परिसरात बाजारासाठी गेलेल्या पद्माबाई सुरेशलाल बोथरा (वय ५५) यांचे ५० हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी चोरून नेले़ याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
हत्यारांचा धाक दाखवून लुटालूट
धूमस्टाईल चो-यांसह हत्यारांचा धाक दाखवून नगर शहर व परिसरात लुटालूट करण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये रात्रीच्यावेळी महामार्गावरून जाणा-या वाहनचालकांना लक्ष्य केले जात आहे. पाच दिवसांपूर्वी शहरातील डाळमंडई येथील व्यापा-याचे साडेचार लाख रूपये चोरट्यांनी चोरून नेले.