वतनदारीची साक्षीदार ऐतिहासिक गढी ढासळतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:52 PM2020-01-13T12:52:45+5:302020-01-13T12:59:59+5:30

शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील मध्ययुगीन कालखंडातील वतनदारीची साक्ष देणारी ऐतिहासिक ‘गढी’ कालऔघात ढासळत आहे. वास्तुकलेचा आदर्श नमुना असलेल्या ऐतिहासिक  ठेव्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

Witness landownership is collapsing historic stronghold | वतनदारीची साक्षीदार ऐतिहासिक गढी ढासळतेय

वतनदारीची साक्षीदार ऐतिहासिक गढी ढासळतेय

संजय सुपेकर  ।  
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील मध्ययुगीन कालखंडातील वतनदारीची साक्ष देणारी ऐतिहासिक ‘गढी’ कालऔघात ढासळत आहे. वास्तुकलेचा आदर्श नमुना असलेल्या ऐतिहासिक  ठेव्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
मूळचे सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील छगन राजाराम पाटील (भराट) यांना १३७० मध्ये हातगाव (ता. शेवगाव) येथील वतनदारी मिळाली होती. मध्ययुगीन कालखंडात वतनदारी सांभाळणा-या सरदेशमुख, देशमुख, पाटील, कुलकर्णी यांना महत्वाचे स्थान होते. मुलकी व महसूल जमा करण्याच्या व्यवस्थेसह संरक्षणाची जबाबदारी ही वतनदार मंडळी सांभाळत असत. पुढे १७ व्या शतकात पेंढारी टोळ्यांचा मोठ्या प्रमाणात होणारा त्रास तसेच परकीय शत्रूंपासून संरक्षणासाठी गढी बांधण्यात आली होती. त्यावेळी गढीचे बांधकाम करताना परिसरातील दगड, माती, चुना आदींचा वापर केला होता. या गढीला चार ते पाच फुट रूंदीची अतिशय भक्कम तटबंदी असून त्यासाठी वीटांबरोबर दगडांचा वापर केलेला आढळतो. गढीला एकच भव्य प्रवेशद्वार असून सुरक्षेच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी एक गुप्त दरवाजा दिसून येतो.
 या वाड्यात राहण्यासाठी अठ्ठेचाळीस खणांचे माळद होते. धान्यसाठा करण्यासाठी भुयारासारखी ‘बळद’ तसेच संपूर्ण वाड्यातील सांडपाणी व पावसाचे पाणी बाहेर पडण्यासाठी भूमीगत बंदिस्त दगडी गटार आजही सुस्थितीत आढळून येते. तटबंदीमध्ये एका बाजूला अंतर्गत शौचालय व्यवस्थाही दिसते. या गढीला चार बुरूज असून प्रत्येक बुरूजाला बाहेरील शत्रूंवर नजर ठेवण्यासाठीही विशेष व्यवस्था आढळून येते.
 सद्यस्थितीला या वतनदारीचा साक्षीदार ठरलेल्या वाड्याची पडझड झाली आहे. आजही या गढीच्या वाड्यात भराट पाटलांचे वारसदार असलेले देविदास पाटील भराट वास्तव्य करून आहेत. तसेच या वाड्याचे इतर वारसदार असलेले दत्तात्रय विठ्ठल भराट (वय ७९), निळकंठ भराट (वय ७५), शिवाजीराव भराट (वय ६०), संतोष भराट (वय ४२) हे गावातच वाड्याच्या बाजूला राहत आहेत.
या वास्तूची रचना त्या काळातील स्थापत्य कलेचा आदर्श नमुना म्हणून पाहायला मिळते. मात्र सध्या काळानुरूप वाड्याची पडझड झाली आहे. पुरातत्त्व विभाग ही वास्तू जतन करण्यास तयार असेल तर आम्ही हा वाडा सवार्नुमते हस्तांतरित करू शकतो, असे हातगाव येथील गढीचे वारसदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.


सदरील वास्तू पुरातत्व विभागास हस्तांतरित झाल्यास संवर्धन करणे शक्य होईल. या वास्तूची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करू व त्यानुसार पुढील आराखडा तयार करता येईल, असे नाशिकच्या राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विराग सोनटक्के यांनी सांगितले.  
 

Web Title: Witness landownership is collapsing historic stronghold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.