संगमनेर बसस्थानकात बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू
By शेखर पानसरे | Published: August 10, 2023 07:57 PM2023-08-10T19:57:29+5:302023-08-10T19:58:01+5:30
बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या नाशिक-अहमदनगर या बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला.
संगमनेर : बसखाली चिरडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयेशा मुनीर बेग (वय ५५, रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी (दि.१०) दुपारी ४. १५ वाजेच्या सुमारास संगमनेर बसस्थानकात हा अपघात घडला. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या नाशिक-अहमदनगर या बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आगाराची नाशिक-अहमदनगर बस (एम. एच. २०, बी. एल. ४०५६) तिचा मार्ग संगमनेर, लोणी, राहुरी असा असताना ही बस संगमनेर बसस्थानकात आली होती. आयेशा बेग या त्यांच्या नातेवाईकांसह संगमनेर बसस्थानकात आल्या होत्या. दुपारी ४. १५ वाजेच्या सुमारास ही बस बसस्थानकातून बाहेर पडत असताना तिच्या चाकाखाली आयेशा बेग चिरडल्या गेल्या. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त बस पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.