महिलेला पेटविले ; तरुणावर खुनी हल्ला
By Admin | Published: August 10, 2014 11:21 PM2014-08-10T23:21:12+5:302014-08-10T23:29:54+5:30
महिलेला पेटविले ; तरुणावर खुनी हल्ला
पारनेर : न सांगता बाजाराला निघून गेल्याचा राग येऊन विवाहितेला पेटवून दिल्याची घटना तालुक्यातील लोणीमावळा येथील चासकरवाडी येथे घडली. तर शेतजमिनीच्या वादातून तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील वारणवाडी येथे घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, रामभाऊ गुंड, बाबासाहेब रामभाऊ गुंड, राजेंद्र भाऊ गुंड, विजय भाऊ गुंड, किसन भाऊ गुंड, दादासाहेब राजेंद्र गुंड व तुकाराम रभाजी काशिद (वय ५०) यांच्यात शेतजमिनीवरुन वाद होता. गुरुवारी वरील सात जणांनी तुकाराम काशिद यांना शिवीगाळ करुन गज व कुऱ्हाडीने बेदम मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारार्थ नगरला हलविण्यात आले आहे.
याप्रकरणी दिलीप तुकाराम काशिद यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आठवडे बाजाराला विचारुन न गेल्याचा राग येऊन चासकरवाडी येथील चांगुणा शिवाजी खुळे हिला पती शिवाजी खुळे यांनी शिवीगाळ करुन दमदाटी केली.
या घटनेनंतर चांगुणा वडिलांकडे गेली. याचा राग येऊन ‘रात्री कुठे होती,असे विचारुन तिच्यावर संशय घेत पतीने अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. यामध्ये चांगुणा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शिरुर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चांगुणा हिने दिलेल्या जबाबावरून पारनेर पोलिसांनी तिचा पती शिवाजी खुळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
(तालुका प्रतिनिधी)