बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी; शेळी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 03:54 PM2019-10-22T15:54:02+5:302019-10-22T15:54:42+5:30
बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार तर महिला जखमी झाली. ही घटना संगमनेर तालुक्यातील कुरण गावच्या शिवारात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. राधाबाई दिलीप मोरे असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
संगमनेर : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार तर महिला जखमी झाली. ही घटना संगमनेर तालुक्यातील कुरण गावच्या शिवारात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. राधाबाई दिलीप मोरे असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
राधाबाई मोरे त्यांच्या शेळ्या चरण्यासाठी घेवून गेल्या असता झाडांच्या आड दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील एका शेळीवर हल्ला केला. बिबट्याच्या तावडीतून शेळीला वाचवत असताना राधाबार्इंवर देखील बिबट्याने हल्ला केला. यावेळी राधाबार्इंच्या डाव्या हाताच्या बोटांना चावा घेतला. या हल्ल्यात राधाबाई मोरे जखमी झाल्या परंतु शेळी ठार झाली. घटनेची माहिती वनविभागाच्या संगमनेर भाग दोनचे वनक्षेत्रपाल एस.एस.माळी यांना मिळाल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या पथकाला सदर ठिकाणी जाण्याचे निर्देश दिले. जखमी झालेल्या मोरे यांना वनपाल ए.एम.मेहेत्रे, वनरक्षक एस.बी.ढवळे, संतोष पारधी, कर्मचारी बबन गायकवाड, ज्ञानदेव फुलसौंदर यांनी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.