बाळ बोठेला मदत करणाऱ्या महिलेचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:59+5:302021-07-07T04:25:59+5:30
बोठे याने सुपारी देऊन ३० नोव्हेंबर २०२० रोजी जरे यांची हत्या घडवून आणली होती. या घटनेनंतर बोठे नगरमधून पसार ...
बोठे याने सुपारी देऊन ३० नोव्हेंबर २०२० रोजी जरे यांची हत्या घडवून आणली होती. या घटनेनंतर बोठे नगरमधून पसार होऊन तो हैदराबाद येथे जाऊन लपला होता. येथे त्याने जनार्दन अकुला चंद्राप्पा व पी. अनंतलक्ष्मी यांची मदत घेतली होती. पोलिसांनी १०२ दिवसांनंतर बोठे याला हैदराबाद येथून जेरबंद केले. यावेळी चंद्राप्पा याला अटक झाली होती. मात्र पी. अनंतलक्ष्मी ही फरार झाली होती. आरोपीला मदत केल्याप्रकरणी पी. अनंतलक्ष्मी हिच्या विरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी पी.अनंतलक्ष्मी हिने वकिलामार्फत जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. जिल्हा न्यायाधीश कुर्तडीकर यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. आरोपी बोठे याच्याशी माझा काही संबंध नाही, त्याला ओळखत नाही, मी जबाबदार महिला असून वकिली व्यवसाय करते, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा युक्तिवाद न्यायालयात आरोपी पक्षाच्यावतीने करण्यात आला. यावर सरकारी पक्षाच्यावतीने सांगण्यात आले की, बोठे हा फरार होता तेव्हा आरोपी ही त्याच्या संपर्कात होती. तिने वेळोवेळी बोठे याला फोन करून त्याच्याशी संपर्क साधला आहे, बोठे याला ओळखत नसेल तर त्याचा मोबाइल क्रमांक आरोपीकडे कसा आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.