वांबोरी चारीचे पाणी शेवटपर्यंत पोहोचेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 05:14 PM2018-11-13T17:14:56+5:302018-11-13T17:15:00+5:30
वांबोरी पाईप चारीचे पाणी अद्यापही पाथर्डी तालुक्यातील अखेरच्या टप्यातील गावांपर्यंत पोहोचलेले नाही.
अहमदनगर : वांबोरी पाईप चारीचे पाणी अद्यापही पाथर्डी तालुक्यातील अखेरच्या टप्यातील गावांपर्यंत पोहोचलेले नाही. काही तलावांत दिवसातून दोन तास पाणी पडते व नंतर पुन्हा गुडूप होते, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने पाणी चोरी होत असल्यानेच अखेरपर्यंत पाणी पोहोचत नाही, असा आरोप आहे.
वांबोरी चारीचे पाणी पाथर्डी तालुक्यात पोहोचत नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला होता. यासंदर्भात मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे व पाथर्डीचे तहसीलदार यांनी या गावांत भेटी देऊन पाणी पोहोचविण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनानुसार पाणी पोहोचलेले नाही, अशी गावांची तक्रार आहे. पांगरमलपर्यंत पाणी आले. तेथून पुढे दोन चाºया जातात. त्यापैकी मिरी व शंकरवाडी या परिसरातील चारीचे पाणी या गावांतील तलावांपर्यंत पोहोचलेले नाही. मढीच्या दिशेने आलेल्या चारीचे पाणी केवळ लोहसरपर्यंत आलेले आहे. त्यापुढे जोहारवाडी, भोसे, करंजी, घाटशिरस, तिसगाव, शिरापूर या भागात पाणी आलेले नाही. काही तलावांत दिवसातून फक्त एक ते दोन तास पाणी पडते.
चारीवर मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी सुरु आहे. जलसंपदा विभागाने कंत्राटी कामगार देखरेखीसाठी नियुक्त केले असून ते पाणीचोरीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी पाणीचोरांकडून आर्थिक मोबदला घेऊन त्यांना संरक्षण दिले जात असल्याचाही संशय आहे.
पाणीचोरांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी या गावांनी केली आहे. बाळासाहेब अकोलकर, मच्छिंद्र सावंत, बंडू पाठक, राहुल गवळी, अभिजीत शिंदे, संतोष आठरे, राजेंद्र अकोलकर, सागर पाठक, भुजंग शिंदे, संदीप अकोलकर, संभाजीराव वाघ, भगवान मरकड, विष्णू मरकड, संभाजी सरोदे, भाऊसाहेब पाठक, बंडू अकोलकर, विष्णू मरकड, भगवान मरकड, सचिन मरकड या शेतकºयांनी सोमवारी मोरे यांची भेट घेऊन पाणी पोहोचविण्याची मागणी केली आहे.
पाणी न पोहोचल्यास शेतकरी कोणत्याही क्षणी आंदोलन पुकारतील, असे शेतकºयांनी सांगितले. शासनाने फसवणूक केल्याने कुणी शेतकºयाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असा इशाराही शेतकºयांच्या शिष्टमंडळाने दिला आहे. पाणी चोरांवर गुन्हे का दाखल होत नाहीत? असा प्रश्न या गावांनी केला आहे.