‘लोकमत’मुळे वांबोरी चारीला पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:05 PM2018-11-01T12:05:56+5:302018-11-01T12:06:02+5:30
अनेक दिवसांपासून तहानलेल्या वांबोरी चारी पाईपलाईनमधून अखेर बुधवारी पाणी खळखळा वाहू लागले. त्यासोबतच या पाण्याची वाट पाहणाऱ्या या भागातील शेतक-यांच्या चेह-यावर हसू फुलले.
करंजी : अनेक दिवसांपासून तहानलेल्या वांबोरी चारी पाईपलाईनमधून अखेर बुधवारी पाणी खळखळा वाहू लागले. त्यासोबतच या पाण्याची वाट पाहणाऱ्या या भागातील शेतक-यांच्या चेह-यावर हसू फुलले. ‘लोकमत’ने या भागातील शेतक-यांच्या मूक वेदनांना ‘वृत्तमालिकेद्वारे’ वाचा फोडली होती. चारीला पाणी दिसताच या भागातील शेतकरी, ग्रामस्थांनी ‘लोकमत’वर अभिनंदनाचा वर्षाव केला.
वांबोरी चारी पाईपलाईन योजनेव्दारे पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांना पाणी मिळण्यासाठी आपण सरकार दरबारी पाठपुरावा केला. तसेच संबंधित अधिका-यांना आदेश दिल्याने या भागातील पाझर तलावात पाणी आल्याचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी बुधवारी सातवड (ता. पाथर्डी) येथील तसेच करंजी परिसरातील तलावात पोहचलेल्या पाण्याची पाहणी करताना सांगितले.
वांबोरी योजनेव्दारे दुष्काळी भागातील गावातील पाझर तलावात पाणी आल्यास या भागातील दुष्काळाची तीव्रता कमी होईल, या उद्देशाने आपण संबंधित खात्याच्या अधिका-यांशी चर्चा करून वांबोरी पाईपलाईन योजनेतून त्वरित पाणी सोडण्याचे आदेश दिले. मात्र याचे श्रेय विरोधक घेण्याचा प्रयत्न करतील, असाही टोला त्यांनी मारला. या प्रश्नावर या भागातील लोकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी त्यांनी माझ्याशी चर्चा केली असती तर चर्चेतून आपण प्रश्न सोडविला असता. उलट आंदोलनाच्या आधीच माझा प्रयत्न सुरू होता. ही योजना या भागाला वरदान ठरणारी आहे. परंतु याची देखभाल करण्याची जबाबदारी या भागातील शेतकºयांची असल्याचे ते
म्हणाले.
यावेळी मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, वांबोरी चारी पाईपलाईन योजनेचे उपअभियंता आंधळे, बाळासाहेब अकोलकर, अॅड. मिर्झा मणियार, सातवडचे कानिफ पाठक, सातवड सेवा संस्थेचे अध्यक्ष बंडू पाठक, एकनाथ आटकर, छानराज क्षेत्रे, नवनाथ आरोळे, रावसाहेब वांढेकर व पाथर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी उपस्थित होते.
‘लोकमत’ ला धन्यवाद
वांबोरी चारी पाईपलाईन योजनेव्दारे या भागातील बैजू बाभूळगाव, खांडगाव, भोसे, करंजी, देवराई, सातवड, घाटसिरस, मढी, तिसगाव, शिरापूर आदी अनेक गावांना पाणी मिळत नसल्याचे निदर्शनास आणून देत ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रसिद्ध करून योजनेवर प्रकाश टाकला होता. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर सरकारी यंत्रणा जागी होऊन दुष्काळी भागाला पाणी मिळाल्याने या भागातील शेतकरी व कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.
वांबोरी चारी पाईपलाईन योजनेव्दारे पाथर्डी तालुक्यातील पाझर तलावात पाणी सोडण्याचे काम ४० दिवसांपासून सुरू आहे.२० नोव्हेंबरपर्यंत या भागातील तलावात पाणी सोडले जाईल. -रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधार
मागील भागात वांबोरी चारी पाईपलाईन फोडण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल करू, तसेच पुढील भागात पाणी येण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे. - रमेश रत्नपारखी, पोलीस निरीक्षक पाथर्डी.