वांबोरीचे पाणी : चारीच्या अंतिम टप्प्यात दुष्काळच
By सुधीर लंके | Published: October 27, 2018 10:46 AM2018-10-27T10:46:22+5:302018-10-27T10:46:26+5:30
राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी भागातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी साकारण्यात आलेल्या वांबोरी पाईप चारी योजनेचे पाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात पाथर्डी तालुक्याच्या अंतिम गावांपर्यंत पोहोचलेले नाही.
सुधीर लंके
अहमदनगर: राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी भागातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी साकारण्यात आलेल्या वांबोरी पाईप चारी योजनेचे पाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात पाथर्डी तालुक्याच्या अंतिम गावांपर्यंत पोहोचलेले नाही. जायकवाडीला पाणी जाते, पण पाथर्डीत पाणी पोहोचत नाही यामुळे पाथर्डी तालुक्यातील ही गावे आता संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. देशातील हा सर्वात महत्त्वांकाक्षी प्रकल्प यामुळे चर्चेत येण्याची शक्यता आहे.
मुळा धरणातील पाण्याचा राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील ज्या अवर्षणप्रवण भागाला लाभ होत नाही तेथे धरणातून पाईप कालव्याद्वारे (वांबोरी चारी) पाणी देण्याचा निर्णय झाला. माजी खासदार बाळासाहेब विखे व गोपीनाथ मुंडे यांनी यासंदर्भात सुरुवातीला १९९०-९१ मध्ये बैठक घेतली होती. या योजनेला १९९९ साली मंजुरी मिळून ती २०११ साली कार्यान्वित झाली.
५९ किलोमीटरच्या पाईपलाईनद्वारे धरणातील पाणी या चार तालुक्यातील ४३ गावांमधील १०२ तलावांमध्ये सोडले जाते. तलावातील पाणी जमिनीत पाझरुन या भागात अप्रत्यक्ष सिंचन होईल, अशी ही योजना आहे. मात्र, ही योजना कार्यान्वित झाल्यापासून ती सक्षमपणे चाललेली नाही. इतर कालव्यांना ज्या पद्धतीने नियमित आवर्तन सोडले जाते. तसे आवर्तन या चारीला दिले जात नाही. त्यात सातत्याने तांत्रिक बिघाड येतात किंवा मध्येच पाण्याची चोरी होते, अशी पाथर्डी तालुक्यातील गावांची तक्रार आहे. योजनेचे लाभार्थी असलेल्या कौडगाव आठरे, करंजी, दगडवाडी, भोसे, सातवड, खांडगाव, जोहारवाडी, मढी, घाटशिरस, तिसगाव, देवराई, त्रिभूवनवाडी, शिरापूर, निंबोडी, करडवाडी, खंडोबाचीवाडी, कान्होबाचीवाडी, वैजूबाभूळगाव या गावांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली असून आमच्या भागातील तलाव न भरल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या योजनेसाठी सातत्याने लढा देणारे बाळासाहेब अकोलकर, मिर्झा मणियार, अरुण आठरे, संभाजी वाघ, राजेंद्र पाठक, प्रभाकर आठरे, भगवान मरकड, दादासाहेब चोथे, अभिजित शिंदे, सुरेश पवार, रावसाहेब गुंजाळ, विजय कारखेले यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. अगोदर अंतिम टप्प्यातील तलाव भरले जावेत. नंतर योजनेच्या प्रारंभिक टप्यातील तलावांत पाणी सोडावे, अशी या गावांची मागणी आहे. प्रशासन जाणीवपूर्वक याकडे व वरील पाणीचोरीकडे दुर्लक्ष करते, अशीही शेतकºयांची तक्रार आहे.
(क्रमश:)