गवत कापल्याच्या कारणातून महिलांना बेदम मारहाण; तिघांविरुध्द अॅट्रॉसिटीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 04:59 PM2020-02-26T16:59:48+5:302020-02-26T17:00:38+5:30
गवत कापण्याच्या कारणावरून तिघांनी महिलांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे मंगळवारी (दि.२५) घडली. याबाबत तिघांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
राहुरी : गवत कापण्याच्या कारणावरून तिघांनी महिलांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे मंगळवारी (दि.२५) घडली. याबाबत तिघांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
सिंधूबाई लहानू नेटके, चंदाबाई बनसोडे, मंगल अडागळे, कुसूमबाई अडागळे, अंबिका अडागळे, संगीता ससाणे, सुनीता दत्तात्रय वैरागर, सुनीता ज्ञानेश्वर वैरागर, शांता गायकवाड, सविता साठे, कला वाघमारे, मनिषा वैरागर (सर्व रा.ब्राम्हणी) या महिला दि.२४ फेब्रुवारी रोजी दिलीप शिवाजी गायकवाड यांच्या शेतात कांदा खुरपणीसाठी गेल्या होत्या. यावेळी दिलीप गायकवाड हे महिलांना म्हणाले, माझ्या शेजारी बांधाच्या कडेला गिन्नी गवत आहे. मला त्याची आवश्यकता नाही. तुमच्या जनावरांना ते गवत घेऊन जा. त्यानुसार वरील सर्व महिला २५ फेब्रुवारी रोजी दिलीप गायकवाड यांच्या शेतात जाऊन गवत कापू लागल्या. यावेळी तेथे महेश मच्छिंद्र गायकवाड व गणेश मच्छिंद्र गायकवाड हे दोघे आले. त्यांना हे शेत आमचे आहे. त्यावर या महिला म्हणाल्या की, आम्हाला दिलीप गायकवाड यांनी गवत कापण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे आम्ही गवत कापीत आहोत. यानंतर सर्व महिलांना खाली बसवून महेश गायकवाड याने कमरेचा पट्टा काढून महिलांना मारहाण केली. यावेळी मच्छिंद्र बाबूराव गायकवाड याला फोन करून बोलावून घेतले. यानंतर येथे मच्छिंद्र गायकवाड तेथे आला. त्यानेही या महिलांना चप्पलाने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी सर्व महिलांनी राहुरी पोलीस ठाणे गाठले. सिंधूबाई लहानू नेटके या महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत मच्छिंद्र बाबूराव गायकवाड, महेश मच्छिंद्र गायकवाड व गणेश मच्छिंद्र गायकवाड या तिघा बाप, लेकांविरोधात अॅट्रॉसिटीसीचा गुन्हा दाखल केला आहे.