बाळंतपणासाठी महिला आली; उपकेंद्रातील आरोग्य सेविका चक्क लपून बसल्या.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:09 PM2020-09-12T13:09:10+5:302020-09-12T13:10:02+5:30
राजूर:-बाळंतपणासाठी महिला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रात आली असताना या उपकेंद्रातील आरोग्य सेविका चक्क घरात लपून बसल्या.अखेर गावातील सुईन आणि आशा सेवीका यांनी प्रयत्न केल्यानंतर तीन तासांनी त्या महिला नैसर्गिकरित्या बाळांत झाल्या,बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी व त्या महिलेच्या पतीने सुटकेचा निःश्वास सोडला.ही घटना अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे गुरुवारी घडली.
राजूर : बाळंतपणासाठी महिला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रात आली असताना या उपकेंद्रातील आरोग्य सेविका चक्क घरात लपून बसल्या.अखेर गावातील सुईन आणि आशा सेवीका यांनी प्रयत्न केल्यानंतर तीन तासांनी त्या महिला नैसर्गिकरित्या बाळांत झाल्या,बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी व त्या महिलेच्या पतीने सुटकेचा निःश्वास सोडला.ही घटना अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे गुरुवारी घडली.
दरम्यान आणीबाणीच्या प्रसंगी आरोग्य सेविकेने प्रसंगावधाना कडे दुर्लक्ष करत घरात लपून बसल्यामुळे ग्रामस्थांनी या आरोग्य सेविकेला निलंबित करत नाहीत तो पर्यंत या उपकेंद्रास टाळे ठोकले आहे. तर या आरोग्य सेविकेचा चौकशी अहवाल तालुका आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे कारवाई साठी पाठविला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की वारंघुशी येथील मंजाबाई निरंकार लोटे या महिलेचे गुरुवारी दुपारी बारा वाजता पोट दुखु लागले.बाळंतपणाच्या कळा येऊ लागल्याने गावातीलच आरोग्य उपकेंद्रात त्यांना नेण्यात आले. त्यावेळी या उपकेंद्रात आरोग्य सेविका आपल्या क्वार्टर मध्येच होत्या. त्यांना आवाज दिला असता त्या घरात नाहीत बाहेर गावात गेल्या असल्याचे घरातील मुलीने सांगितले.तोपर्यंत मंजाबाई च्या वेदना प्रचंड वाढत चालल्या होत्या.सरपंच अनिता कडाळी यांनी आपल्या कर्मचाऱ्याला गावात दोन वेळा दवंडी देण्यास सांगितले. यानुसार दोनवेळा दवंडी देऊनही या आरोग्य सेविका उपस्थित झाल्या नाहीत. शेवटी गावातीलच सुईन सोनाबाई लोटे यांनी आशा सेविकेच्या मदतीने तीन तासानंतर त्या महिला नैसर्गिकरित्या बाळांत झाल्या.
यानंतर माजी उपसभापती भरत घाणे व इतरांनी आरोग्य सेविकेच्या क्वार्टरचा दरवाजा उघडला आणि सरपंच अनिता संजय कडाळी आत गेल्या. यावेळी संबंधित आरोग्य सेविका आतच बाथरूममध्ये लपून बसल्याचे आढळून आले.सरपंच कडाळी यांनी त्यास बाहेर आणले आणि खरा प्रकार उघड झाला. ही घटना माजी उपसभापती घाणे यांनी आरोग्य अधिकारी इंद्रजित गंभिरे यांना कळवली.त्यांनी तात्काळ डॉक्टर आणि वाहन पाठवून देत असल्याचे सांगितले मात्र तोपर्यंत त्या महिलेचे सुखरूप पणे बाळंत झाल्या होत्या.
ऐन मोक्याच्या वेळी आरोग्य सेविका घरात लपून बसल्याने संतप्त सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी उपकेंद्रास टाळे ठोकले आणि जोपर्यंत या आरोग्य सेविकेचे निलंबन होत नाही तोपर्यंत या गावातील उपकेंद्राचे टाळे आम्ही उघडणार नसल्याचे सांगितले.यावेळी सरपंच अनिता संजय कडाळी,पंचायत समिती सदस्या अलका अवसरकर, उपसभापती भरत घाणे, सदस्य गणेश शिंदे,सुनिता डगळे, भिमाबाई लोटे व भिमा लोटे यांच्या सह अनेक गावकरी उपस्थित होते.या उपकेंद्रात उपचारासाठी दाखल झालेल्या ग्रामस्थांना काहीही दुखत असले तरी त्या एकच प्रकारची गोळी देत असल्याचे सदस्य शिंदे यांनी सांगितले.
कारणे दाखवा नोटीस बजावली
या घटनेची तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ इंद्रजीत गंभिरे यांनी तात्काळ दाखल घेत घटनास्थळी जाऊन चौकशी केली. तयार केलेला चौकशी अहवाल त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठविला असून त्या आरोग्य सेविकेवर कारवाई करण्यात येईल तर उपस्थित नसलेल्या दुसऱ्या आरोग्य सेविकेस कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे डॉ गंभिरे यांनी सांगितले.