महिलेच्या कृत्याने पोलीसही चक्रावले! बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला अन् घरातून झाली फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:37 IST2025-04-01T13:37:09+5:302025-04-01T13:37:39+5:30

गावातील चारशे ते पाचशे नागरिकांनी महिलेचा आजूबाजूच्या सर्व परिसरात शोध घेतला होता.

Women faked a leopard attack and fled from her home incident in rahuri taluka | महिलेच्या कृत्याने पोलीसही चक्रावले! बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला अन् घरातून झाली फरार

महिलेच्या कृत्याने पोलीसही चक्रावले! बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला अन् घरातून झाली फरार

Ahilyanagar Crime: राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथून तीन दिवसांपूर्वी शेतात गवत कापायला गेलेली महिला बेपत्ता झाली होती. तिला बिबट्याने नेले असावे, या शंकेने वन विभागासह पोलिस, गावकऱ्यांनी दोन दिवस शेत पिंजून काढले, परंतु या महिलेने पोलिसांची दिशाभूल करून आपल्यावर बिबट्याचा हल्ला झाल्याचे भासवल्याची बाब समोर आली असून, पोलिसांनी ४८ तासांत या महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारागाव नांदूर येथील ३७ वर्षीय महिला २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान शेतात गवत कापायला जाते, असे सांगून गेली होती. संध्याकाळी ७ वाजून गेल्यानंतरही ती परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शेतात जाऊन तिचा शोध घेतला. त्यावेळी शेतात गवत आणायला घेऊन गेलेले कापड, मोबाइलचे कव्हर, मंगळसूत्र, हातातील फुटलेल्या बांगड्या, मोबाइल बॅटरी, तसेच गवत कापण्यासाठी नेलेला विळा व त्याला रक्त लागलेले, अंगात असलेला शर्ट फाटलेल्या अवस्थेत, अंगावरील साडीचा तुकडा, फाटलेल्या अवस्थेतील स्कार्फ, असे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले, तसेच कापून ठेवलेले गवतही अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यामुळे महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याचा समज झाल्याने कुटुंबीयांनी तात्काळ पोलिस व वन विभागाशी संपर्क साधला. पोलिस व वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी, तसेच गावातील चारशे ते पाचशे नागरिकांनी महिलेचा आजूबाजूच्या सर्व परिसरात शोध घेतला; परंतु ती मिळून न आल्याने नातेवाइकांनी पोलिस स्टेशनला हरवल्याचा गुन्हा दाखल केला.

घटना घडलेल्या ठिकाणी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकामार्फत बारकाईने तपासणी करण्यात आली; परंतु तेथे कोठेही बिबट्याचा हल्ला झाला आहे, असा पुरावा मिळाला नाही. त्यावरून या प्रकरणामध्ये महिलेकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला, अशी पोलिसांची खात्री झाली. पोलिसांनी त्या दिशेने गोपनीय माहितीनुसार व अचूक तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला असता अवघ्या ४८ तासांत या महिलेला प्रवरा संगम येथून ताब्यात घेतले.

दरम्यान, ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके, पोलिस नाईक गणेश सानप, हवालदार विकास वैराळ, पोलिस शिपाई सागर नवले, अंबादास गीते, प्रमोद ढाकणे, सायबर सेलचे सचिन धनाड यांच्या पथकाने केली.

महिलेने का केले हे कृत्य ?
शेतात आपल्यावर बिबट्यानेच हल्ला केला, असे पुरावे मागे सोडून ही महिला नेमकी कोठे गेली? तिने हे पुरावे मागे ठेवून पोलिसांसह सर्वांचीच दिशाभूल का केली, याचे कारण मात्र पोलिसांनी अद्याप दिलेले नाही. त्यामुळे आता तपासात पोलिस कोणत्या गोष्टी रेकॉर्डवर घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Web Title: Women faked a leopard attack and fled from her home incident in rahuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.