शेतकरी महिलांनी उद्योजक व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:14 AM2021-03-29T04:14:20+5:302021-03-29T04:14:20+5:30
राहुरी : परसबागेतील भाजीपाला व कुक्कुटपालन या जोडधंद्याची जोड दिली तर ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचविण्यास मदत होणार आहे. ...
राहुरी : परसबागेतील भाजीपाला व कुक्कुटपालन या जोडधंद्याची जोड दिली तर ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचविण्यास मदत होणार आहे. शेतीबरोबरच महिला उद्योजक निर्माण झाल्या पाहिजेत. महिलांनी कृषीच्या तंत्रज्ञानाचे धडे घेतले तर त्या बचतगटाच्या माध्यमातून इतर महिलांना याबाबत अवगत करू शकतात, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ.अशोक फरांदे यांनी केेले.
कृषिविस्तार व संज्ञापन विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या दोनदिवसीय अनुसूचित जाती महिलांच्या स्थिती स्थापकत्वाचे बळकटीकरण या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ.फरांदे बोलत होते.
प्रमुख पाहुणे डॉ. श्रीमंत रणपिसे म्हणाले, फळप्रक्रिया उद्योगात खूप संधी उपलब्ध आहेत. आवळा प्रक्रिया करून अनेक महिलांनी गृहउद्योग सुरू केले आहेत. आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ दिले आहे.
प्रास्ताविक डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले. प्रशिक्षणास २५ अनुसूचित जाती महिला उपस्थित होत्या. यावेळी डॉ. विष्णू गरंडे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. भगवान देशमुख, डॉ. विक्रम कड, डॉ. प्रमोद साखरे, प्रा.धनश्री पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची रूपरेषा डॉ. गोरक्ष ससाणे यांनी विशद केली. सूत्रसंचालन पद्मकुमार पाटील यांनी केले. डॉ. ज्ञानदेव फराटे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. मनोहर धादवड, राजुदास राठोड, विश्वनाथ पवार, विश्वनाथ तोंडे व अनिल येवले यांनी विशेष परिश्रम घेतले.