दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 02:43 PM2018-10-13T14:43:27+5:302018-10-13T14:44:32+5:30

मांडवगण येथील गोसावीवाडी येथे गुरूवारी मध्यरात्री सहा दरोडेखोरांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकत १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला.

Women injured in armed attack of dacoits | दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात महिला जखमी

दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात महिला जखमी

श्रीगोंदा : मांडवगण येथील गोसावीवाडी येथे गुरूवारी मध्यरात्री सहा दरोडेखोरांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकत १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. त्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात मंदाबाई घाडगे या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दत्तात्रय घाडगे यांनी फिर्याद दिली. गुरूवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दरोडेखोरांनी घाडगे यांच्या घरात प्रवेश केला. झोपलेल्या मंदाबाई यांना जाग आल्यानंतर एक जण घरात उचकापाचक करताना दिसला. त्या प्रतिकार करण्यासाठी उठल्या असता इतर दोन जणांनी त्यांचा छातीवर पाय ठेवत त्यांच्या गळ्यावर तलवार चालविण्यासाठी उगारली. मात्र मंदाबाई यांनी धाडसाने तलवारीचा वार हातावर घेतला. त्यामुळे हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अशाही अवस्थेत त्यांनी तलवार सोडली नाही.
जखमी मंदाबाई यांना रूईछत्तीशी (ता.नगर) येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मंदाबाई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून १ लाख ६२ हजार रूपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला. दत्तात्रय घाडगे हे बाजूच्या घरात मदतीसाठी गेले असता दरोडेखोरांनी त्यांच्याही घरात प्रवेश करून त्यांच्या घरात असणाऱ्या कपाटाची उचकापाचक केली.

तीन दरोडेखोरांना अटक
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर श्रीगोेंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार व नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रात्रीच परिसर पिंजून पवन युनूस काळे (वय २६), जीवन युनूस काळे (वय २६), रवींद्र युनूस काळे (वय ३५, सर्व रा. गुणवडी, ता. नगर) या तीन आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Women injured in armed attack of dacoits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.