महिलांना शस्त्राचा धाक दाखवून ऐवज लांबविला
By Admin | Published: August 27, 2014 10:46 PM2014-08-27T22:46:11+5:302014-08-27T23:08:30+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात चोऱ्या,दरोड्याचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांनी चांडगाव येथे म्हस्के वस्तीवर धुमाकूळ घालून महिलांना शस्त्राचा धाक दाखवून सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला.
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात चोऱ्या,दरोड्याचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांनी चांडगाव येथे म्हस्के वस्तीवर धुमाकूळ घालून महिलांना शस्त्राचा धाक दाखवून सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
सामानाची उचकापाचक
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चांडगाव येथील म्हस्के वस्तीवर चार ते पाच चोरट्यांनी प्रवेश केला. यावेळी पोपट म्हस्के यांच्या घराच्या दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व महिलांना शस्राचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले व घरातील सामानाची उचकापाचक केली. घरातील पेटीत शेत कामासाठी आणलेले दहा हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. घरातील एक मोबाईलही चोरून नेला.
दागिने लांबविले
या घटनेत पोपट म्हस्के यांच्या घरातील महिलांच्या अंगावरील तीन तोळे सोने, रोख दहा हजार रुपये, एक मोबाईल असा सुमारे एक लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे पोपट म्हस्के यांनी सांगितले.
नागरिकांची जागरुकता
म्हस्के यांच्या घरातील चोरी नंतर चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागे राहत असणारे हरिभाऊ म्हस्के यांच्या घराकडे मोर्चा वळविला. येथे चोरटे आल्याची चाहूल लागल्यानंतर म्हस्के घराचा दरवाजा आतील बाजुने दाबून धरला. त्यामुळे चोरट्यांना दरवाजा उघडता आला नाही. म्हस्के यांनी घरातूनच शेजारी राहणाऱ्यांना फोनवरून चोरटे आल्याची माहिती दिली. नागरिक जागे झाल्याचे पाहून चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
श्रीगोंदा शहरासह तालुक्यात चोऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आतापर्यंत झालेल्या अनेक चोऱ्यांचा यशस्वीरित्या तपास लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
७० हजाराचा ऐवज नेला
कुकाणा : येथील बाजारतळावरील किशोर चांदमल भंडारी यांचे किराणा दुकान फोडून चोरट्यांनी रोख चाळीस हजार व तीस हजाराचा किराणा असा सुमारे ७० हजाराचा ऐवज चोरुन नेला. याबाबत भंडारी यांनी नेवासा पोलिसात फिर्याद दिली. नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करुन घरी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सहाच्या सुमारास फिरण्यासाठी जात असताना दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी दुकानातून सिगारेट पाकिटे, तूप, चहा पावडर, पेस्ट तसेच इतर ऐवज चोरुन नेला. चोरट्यांनी शटरचा कोयंडा तोडून चोरी केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बी.जे. वंजारी करीत आहेत. कुकाणा भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.