पालिकेवर महिलांचा हल्लाबोल

By Admin | Published: August 30, 2014 11:16 PM2014-08-30T23:16:29+5:302014-08-30T23:21:24+5:30

संतप्त महिला व युवकांनी शनिवारी (दि़३०) दुपारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या कक्षाची मोडतोड केली़

Women's attack on the police | पालिकेवर महिलांचा हल्लाबोल

पालिकेवर महिलांचा हल्लाबोल

कोपरगाव : शहरातील मोहनीराजनगर भागाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन गोदावरी नदीला आलेल्या पुरात दीड महिन्यापूर्वी वाहून गेली़ परंतु अद्यापही पाईपलाईन दुरुस्ती करण्यात आली नाही़ तसेच टँकरद्वारे पाणी वाटपात अन्याय केला जात असल्यामुळे संतप्त महिला व युवकांनी शनिवारी (दि़३०) दुपारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या कक्षाची मोडतोड केली़
कोपरगाव नगरपालिकेचा मोहनीराजनगर, बेट भागास पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन मध्यंतरी गोदावरी नदीस आलेल्या पुरात वाहून गेली. त्यास दीड ते दोन महिने उलटले आहेत़ मात्र, अद्यापही नगरपालिका प्रशासनाने पाईपलाईनची दुरुस्ती केली नाही़ बेट, मोहनीराजनगर भागास टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यात पक्षपातीपणा केला जात असल्याचा आरोप करुन महिला व युवकांनी शनिवारी पालिकेत आंदोलन केले़ बापू काकडे, काळू आल्हाट, गणेश काकडे, बाळासाहेब नवघरे आदी शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा आणला. यावेळी मुख्याधिकारी हजर नव्हते. कार्यालयीन अधिक्षक तांबट व अन्य कर्मचारी होते. महिलांनी घोषणाबाजी व रिकामे हंडे वाजवून सत्ताधाऱ्यांचा निषेध केला़ महिलांनी त्याच हंड्यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या दालनाच्या खिडकी, दरवाजाच्या काचा फोडल्या. मुख्याधिकाऱ्यांची कक्षाची तसेच कर्मचाऱ्यांच्या टेबल, खुर्च्यांची मोडतोड केली़ कपाटे फोडून आतील कागदपत्रे फेकून दिली.
नगरपालिकेत या महिलांकडून तोडफोड चालू असल्याचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांना समजल्यानंतर राजेंद्र झावरे, भरत मोरे, प्रशांत कडू, अशोक लकारे यांच्यासह ते पालिकेत आले़ नगराध्यक्षांच्या दालनात संजय सातभाई यांना महिलांना धारेवर धरले. आमच्या भागास टँकर का नाही, नगरपालकेचा पाणीपुरवठा दोन महिन्यापासून बंद आहे. पाईपलाईन कधी दुरुस्त होणार, नगरपालिकेचे मोहनीराजभागाकडे अजिबात लक्ष नाही. पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर असताना कर्मचारी, पदाधिकारी काय करतात, नगरपालिकेस मोहनीराजनगर भागाला न्याय देता येत नसेल तर आम्हाला ग्रामीण भागात टाका मग आम्ही आमचा विकास करतो, आम्हाला नगरपालिकेची गरज नाही, अशा शब्दात महिलांनी सातभाई यांना धारेवर धरले़
(प्रतिनिधी)

Web Title: Women's attack on the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.