'निळवंडे' च्या पाण्यासाठी महिलांचे उपोषण; कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे आंदोलन
By सचिन धर्मापुरीकर | Published: December 9, 2023 07:37 PM2023-12-09T19:37:47+5:302023-12-09T19:39:11+5:30
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव -अंजनापुर नं. ३ चा तलाव निळवंडे धरणाच्या पाण्याने भरून देण्याबाबत महीलांनी तीव्र भूमिका घेतली आहे.
कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे निळवंडे धरणाच्या कालव्यातुन अंजनापुर नंबर ३ पाझर तलाव भरुन देण्याच्या मागणीसाठी सहा महीलांनी शनिवार (दि. ९) पासुन उपोषण सुरु केले आहे. उपोषणकर्त्यांमध्ये अनिता खालकर, मंदा वर्पे, संजिवनी वर्पे, अलका खालकर, संगिता वर्पे, मनिषा वर्पे या महिला सहभागी आहेत.
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव -अंजनापुर नं. ३ चा तलाव निळवंडे धरणाच्या पाण्याने भरून देण्याबाबत महीलांनी तीव्र भूमिका घेतली आहे. रांजणगाव देशमुख येथे दि.१६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण झाले. यावेळी परिसरातील सर्व बंधारे भरण्यात यावे, ही प्रमुख मागणी होती. अंतिम टोकापर्यंत पाणी पोहोचल्याशिवाय पाणी बंद करणार नाही असे लेखी आश्वासन दिलेले असतानाही रांजणगाव-अंजनापुर नं. ३ चा बंधारा भरण्यात आलेला नाही. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने आधीच शेतकरी हवालदिल झालेले आहेत. बंधारा न भरल्यास पिण्याचे पाणी व पशुधन जगणार नाही. त्यामुळे रांजणगाव-अंजनापुर नं.३ चा बंधारा भरणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. बंधारा भरत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.
प्रशासनाने आमचा पाझर तलाव भरला नाही.कोणतीही कल्पना न देता आमच्याकडे येणारे पाणी बंद करण्यात येउन आमच्यावर अन्याय केला आहे.आता पाणी आल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.आमचा पाझर तातडीने भरुन द्यावा.
-अनिता खालकर, उपोषणकर्त्या महीला