चोरट्यांवर महिला स्कॉडचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 03:45 PM2018-10-10T15:45:01+5:302018-10-10T15:45:49+5:30
नवरात्रौत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील महिला पोलीस चोरट्यांवर नजर ठेवणार आहेत.
अहमदनगर : नवरात्रौत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील महिला पोलीस चोरट्यांवर नजर ठेवणार आहेत. तसेच या काळात पेट्रोलिंगही वाढविण्यात येणार आहे.
बुधवारपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. शहरातील केडगाव व बु-हाणनगर येथील देवी मंदिरात नवरात्रौत्सवात दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांचे दागिने ओरबाडतात. गेल्या काही महिन्यांत शहरात घरफोड्या व धूमस्टाईलने महिलांचे दागिने ओरबाडण्याचे प्रमाण वाढले आहे. नवरात्रौत्सवात हे प्रकार टाळण्यासाठी गुप्तचर विभागातील महिला पोलिसांची गर्दीच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला पोलीस साध्या वेशात वावरून चोरट्यांवर नजर ठेवणार आहेत. केडगाव व बु-हाणनगर येथे दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी केडगाव व बु-हाणनगर येथील देवी मंदिर परिसरात प्रत्येकी ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच मंदिर परिसरात छुपे कॅमेरेही लावण्यात आलेले आहेत. दोन्ही मंदिराच्या ठिकाणी दहा दिवस २४ तास पोलीस बंदोबस्त राहणार आहे.
नवरात्रौत्सव शांततेत पार पडावा, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षा मिळावी यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिराच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, या काळात रात्रीची पेट्रोलिंगही वाढविण्यात आली आहे. -संदीप मिटके,
पोलीस उपअधीक्षक