अच्छे दिन शब्दामुळे अनेकांच्या स्वप्नांचे खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:20 AM2021-02-10T04:20:00+5:302021-02-10T04:20:00+5:30
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद व आमदार लहू कानडे मित्र मंडळाच्या वतीने ही मैफील आयोजित ...
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद व आमदार लहू कानडे मित्र मंडळाच्या वतीने ही मैफील आयोजित करण्यात आली होती. आयोजित केलेल्या काव्य मैफिलीत दौंडकर यांनी कवितेतून श्रोत्यांना अंतर्मुख केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, आमदार डॉ.सुधीर तांबे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, राजेंद्र नागवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, ज्ञानदेव वाफारे, अविनाश आपटे आदी उपस्थित होते.
. यात अशोक नायगावकर, प्रशांत मोरे, साहेबराव ठाणगे, डॉ.सुरेश शिंदे, नारायण पुरी, प्रकाश होळकर, भरत दौंडकर, तुकाराम धांडे, संजीवनी तडेगावकर यांनी सहभाग घेतला. प्रास्तविक लहू कानडे यांनी केले.
कवी दौंडकर म्हणाले, चरख्या शेजारी फोटो छापला म्हणजे कोणालाही महात्मा गांधी होता येत नाही. काही निरर्थक प्रश्नांवर चर्चा केली जात असताना दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांना का ठार मारण्यात आले? असे प्रश्न मात्र उपस्थित केले जात नाही. कालपर्यंत या मंडळींची हत्या केली गेली. मात्र पुढील काळात आमच्यासारख्या साहित्यिकांना देखील धोका संभवतो.
सर्वच कवींनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर कवितेतून भाष्य केले. देशात भयग्रस्त वातावरण असून सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्येवर त्यांनी चिंता व्यक्त केली. नारायण पुरी यांनी सद्य सामाजिक व राजकीय स्थितीवर भाष्य करणारी जांगडगुत्ता कविता सादर केली.
अशोक नायगावकर यांनी नेहमीच्या खुमासदार शैलीतील विनोदी कवितांतून उपस्थितांची मने जिंकली. साहेबराव ठाणगे यांनी ग्रामीण कवितेमधून शेतकर्यांच्या व्यथा मांडल्या. प्रशांत मोरे यांनी विषमतेवर भाष्य केले. संजीवनी तडेगावकर यांनी आधुनिक जीवनशैलीवर चिमटे काढले. इगतपुरी घाटातील आदिवासी कवी तुकाराम धांडे यांनी भंडारदरा धरणाजवळ असूनही आदिवासींना पाण्यावाचून जीवन जगावे लागत असल्याचे वर्णन कवितेतून केले. त्यांनी नोकरशाहीवर हल्लाबोल केला.
सूत्रसंचालन डॉ.सुरेश शिंदे यांनी केले. आभार मसापचे प्रकाश कुलथे यांनी मानले. यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे, सचिन गुजर, अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे आदी उपस्थित होते.
-------