नेवासा-शेवगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:25 AM2021-08-24T04:25:20+5:302021-08-24T04:25:20+5:30
भेंडा : ‘खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये रविवारी (दि.२२) प्रसिद्ध झाले. या वृत्ताची तत्काळ दखल ...
भेंडा : ‘खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये रविवारी (दि.२२) प्रसिद्ध झाले. या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन रविवारीच भेंडा बसस्थानक ते मळीचा ओढ्यापर्यंतचे खड्डे तातडीने बुजविण्यात आले. सोमवारी नेवासा फाटा येथून भेंड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले.
शुक्रवारी (दि.२०) रात्री आठच्या दरम्यान भेंडा येथील मळीच्या ओढ्याजवळ खड्डे चुकविताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वीच जर खड्डे बुजविले असते तर या अपघातात हा मृत्यू झाला नसता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाहनचालकांनी केली होती.
आता केवळ नेवासा-शेवगाव रस्त्यावरील खड्डे न बुजविता नेवासा तालुक्यातील भेंडा ते वडाळा बहिरोबा, भेंडा ते सलाबतपूर, मुकींदपूर ते गेवराई, नेवासा ते श्रीरामपूर, प्रवरासंगम ते मंगळापूर, सलाबतपूर ते दिघी, गोगलगाव ते जळका या रस्त्यावरील खड्डे व श्रीरामपूर-शेवगाव रस्त्यावरील खड्डे, साईडपट्ट्यांचे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी व प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी दिला आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आजपर्यंत अनेक अपघात झाले. काही लोकांना कायमचे अपंगत्व आले. तर काहींना जीव गमवावा लागला. रस्ते दुरुस्तीसाठी
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांनी अनेक वेळा तक्रारी करूनही रस्ते दुरुस्तीची कामे दर्जेदार व वेळेवर होत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर या भागातील नागरिकांची तीव्र नाराजी आहे. नेवासा तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांची कामे तातडीने सुरू झाली नाही तर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तत्पूर्वी बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी जनतेकडून होत आहे.
----
२३ भेंडा न्यूज