विधानसभा निवडणुकीपूर्वी उड्डाणपुलाचे काम : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:37 AM2019-06-14T11:37:49+5:302019-06-14T11:38:01+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि तीन वेळा भूमिपूजन झालेला नगर शहरातला उड्डाणपूल लवकरच मार्गी लागेल.

Work of flyover before assembly elections: Sujay Vikhe | विधानसभा निवडणुकीपूर्वी उड्डाणपुलाचे काम : सुजय विखे

विधानसभा निवडणुकीपूर्वी उड्डाणपुलाचे काम : सुजय विखे

अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि तीन वेळा भूमिपूजन झालेला नगर शहरातला उड्डाणपूल लवकरच मार्गी लागेल. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पुलाचे कॉलम उभे राहिलेले दिसतील, अशी माहिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी दिली.
गुरुवारी खासदार विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली़ नगर मतदारसंघातील प्रलंबित व नियोजित रस्ते आणि प्रशासकीय इमारतींच्या कामांचा विखे यांनी आढावा घेतला़ या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गो़ श़ मोहिते, कार्यकारी अभियंता राऊत, ए़ बी़ चव्हाण, ए़ एऩ राजगुरु आदी उपस्थित होते़
बैठकीनंतर विखे यांनी जिल्हा परिषदेत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली़ ते म्हणाले, नगर शहरातील उड्डाणपूल, बाह्यवळण रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत, आरटीओची इमारत याशिवाय जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्त्यांच्या प्रलंबित कामांसंदर्भात आढावा बैठकीत चर्चा केली़ मागील तीन वर्षात केंद्रीय राखीव निधीतून नगर जिल्ह्याला एक रुपयाही मिळाला नाही़ त्यामुळे हा निधी आणून जिल्हा मार्ग व राज्य मार्गांची कामे करण्यासाठी पाठपुरावा करु़ किमान १०० कोटी रुपये रस्त्यांच्या कामासाठी आणू़ त्यामुळे या कामांचे प्रस्ताव द्यावेत, असे या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचित केले आहे़
नगर-मनमाड, नगर बाह्यवळण हे मार्गही राष्ट्रीय महामार्गांमध्ये घेतले आहेत़ नगर बाह्यवळण रस्त्याचे विळद घाट ते मनमाड रोडपर्यंत दुरुस्तीचे काम झाले आहे़ पुढील काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे़ बाह्यवळण रस्त्याचे काम मार्गी लागल्यानंतर सर्व वाहतूक बाह्यवळण मार्गे वळविण्यात येईल़ त्यानंतर नगरमधील उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आली़ यापुलासाठी ३६५ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे़ ठेकेदार नेमला आहे़ ८६ टक्के जमिनीचे अधिग्रहणही झाले आहे़ मात्र ९० टक्क्यांपेक्षा जास्त जमिनीचे अधिग्रहण व्हायला हवे, असा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा नियम आहे़ यश पॅलेस ते एसबीआय चौकापर्यंत जमीन अधिग्रहणाची गरज नाही़ तेथे फक्त साईडपट्ट्या अधिग्रहित करायच्या आहेत़ भूसंपादनासाठी ५२ कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिले आहेत़ उड्डाणपुलाच्या उर्वरित जमिनीच्या भूसंपादनासाठी मोजणी सुरु आहे़ मात्र, हे अधिग्रहण मागे राहिले तरी कामास प्रारंभ करण्याची मान्यता द्यावी, अशी मागणी आपण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार आहोत़ पावसाळी अधिवेशनात उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावणार आहे, असे विखे यांनी सांगितले़

लोकप्रतिनिधी चोर नाहीत
प्रशासन अनेकदा लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही़ तीन दिवसांपूर्वी उड्डाणपुलाच्या आढावा बैठकीला महापौरांना बोलाविले़ तेव्हा त्यांना काम कोठे रखडले आहे, ते समजले़ जे काम एका फोनवर होणारे असते ते काम प्रशासनामुळे सहा महिने रखडले़ त्यामुळे यापुढे असे चालणार नाही़ प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णयप्रक्रियेत सहभागी करुन घेतले पाहिले़ प्रशासन काम करते अन् लोकप्रतिनिधी चोर आहेत, असे नाही़ आम्हाला लोकांनी लोकांच्या कामासाठी निवडून दिले आहे़ प्रशासनाकडून कामं करुन घेणं ही आमची जबाबदारी आहे़ आतापर्यंत लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले़ प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना विचारलं जात नाही, हे आता बंद झालं पाहिजे, अशा शब्दात खासदार विखे यांनी प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले.

Web Title: Work of flyover before assembly elections: Sujay Vikhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.