पक्षवाढीसाठी काम करा अन्यथा पद सोडा; शिवसेना नेत्यांची पदाधिकाऱ्यांना तंबी
By अरुण वाघमोडे | Published: February 5, 2024 08:23 PM2024-02-05T20:23:26+5:302024-02-05T20:24:36+5:30
कदम व चौधरी यांनी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली.
अरुण वाघमोडे, अहमदनगर: अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रिक्त जागांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करा, नवीन शाखा उघडा तसेच शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तळमळीने काम करा. ज्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या ध्येयधोरणाप्रमाणे काम करायचे नाही त्यांनी पद सोडावे, त्यांच्या जागी चांगले काम करणाऱ्यांना संधी दिली जाईल. पदधिकाऱ्यांना अशी तंबी शिवसेनेचे (शिंदे गट ) नगर दक्षिण लोकसभा निरिक्षक अभिजित कदम यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी (दि.५) कदम यांनी शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी पक्षाचे सचिव तथा विभागीय संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते, आनंद शेळके, दामोदर भालसिंग, आमोल हुंबे आदींसह तालुका प्रमुख, महिला आघाडी प्रमुख, युवा सेना प्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते. होते. नगर शहरात पुढील महिन्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित मेळावा घेतला जाणार आहे. या संदर्भातील पूर्वतयारी, पदाधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती करणे तसेच पदाधिकाऱ्यांनी सुचविलेली कामे शासकीय निधीतून होतात नाही आदींबाबत कदम यांनी सूचना केल्या. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचनाला. यामध्ये प्रामुख्याने सरकारी कार्यालयात शिवसैनिकांची कामे होत नाहीत, अधिकारी ऐकत नाहीत. अशा स्वरुपाच्या या तक्रारी होत्या. या तक्रारींची नोंद घेऊन त्यावर कार्यवाही केली जाईल असे कदम यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान कदम व चौधरी यांनी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली.
जिल्ह्यात पक्षवाढीसाठी संघटनेची बांधणी करावी, मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना तळागळातील घटकांपर्यंत पोहोचतात की, नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ज्या पदाधिकाऱ्यांना संघटनेत काम करण्यासाठी वेळ नाही त्यांच्या जागी चांगले काम करणाऱ्यांना संधी द्या, अशा सूचना नगर येथे झालेल्या बैठकीत जिल्हा प्रमुखांना दिल्या आहेत. - अभिजित कदम, लोकसभा निरिक्षक शिवेसना