संघर्षाला यश! ‘त्या‘ गावात पहिल्यांदाच खणखणणार मोबाइल, मोबाइल टॉवर उभारणीचे काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 05:53 AM2023-05-08T05:53:52+5:302023-05-08T05:56:14+5:30
रांजणी हे नगर तालुक्यातील गर्भगिरी डोंगररांगांच्या कुशीत वसलेले टुमदार गाव.
योगेश गुंड
केडगाव (जि. अहमदनगर) : रांजणी हे नगर तालुक्यातील गर्भगिरी डोंगररांगांच्या कुशीत वसलेले टुमदार गाव. गावाभोवती डोंगर व दऱ्यांचा भाग. यामुळे साऱ्या जगाच्या हातात मोबाइल आला असला तरी रांजणी हे गाव मात्र नेहमीच मोबाइल फोनच्या रेंजबाहेरच राहिले. यामुळे गावकऱ्यांना एक ना अनेक संकटांना तोंड द्यावे लागे. मोबाइलला गावात रेंज मिळावी म्हणून गावाने मोठा संघर्ष केला. शेवटी त्यांच्या संघर्षाला यश मिळाले. गावात बीएसएनएल कंपनीने टॉवर उभारणीचे काम हाती घेतल्याने महिनाभरात रांजणी गावात मोबाइल फोन खणखणणार आहेत.
‘डबल इंजिन’मध्ये कोणत्या इंजिनला किती कमिशन?
गावातील प्रत्येक घरात खवा करणारे व नाट्यचळवळीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रांजणीची लोकसंख्या दोन हजारांच्या घरात आहे. प्रत्येक सरकार आश्वासन देत होते. पण गावात रेंज येत नव्हती. अखेर गावकऱ्यांनी एकत्र येत मोबाइल टॉवरसाठी पाठपुरावा सुरू केला. अर्ज, निवेदने दिली. अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. माजी सरपंच दिलीप झिपुर्डे यांच्यासह गावकऱ्यांनी खासदार डॉ. सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्याकडे मोबाइल टॉवरसाठी साकडे घातले. नुकतेच गावकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले.
तरी गावात ५०० मोबाइल
गाव ‘आउट ऑफ कव्हरेज’ असले, तरी येथील पाच-सहाशे ग्रामस्थ मोबाइल वापरतात, हे विशेष. मोबाइलला रेंज नसल्याने गावकरी, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.
ऑनलाइन शिक्षणात अडचणी
गावात रेंज नसल्याने आरोग्यविषयक इमर्जन्सीवेळी संपर्क होत नसल्यामुळे जीवितहानीच्या घटना गावात घडल्या आहेत.
ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी दूरवर डोंगरावर जाऊन विद्यार्थी रेंज मिळवत असत. कोविड काळात ग्रामस्थांनी अनेक अडचणींचा सामना केला.