सीईटी परीक्षेबाबत धोरण ठरविण्याचे काम सुरू; प्राजक्त तनपुरे यांचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:11 PM2020-07-19T12:11:58+5:302020-07-19T12:12:59+5:30
राज्यातील कोरोनाची सध्याची स्थिती पाहता पदवी परीक्षा घेणे केवळ अशक्य आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून केंद्राने, तसेच यूजीसीने आपला निर्णय बदलून या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करावे, असे स्पष्ट करीत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षांबाबत धोरण ठरविण्याचे काम सुरू आहे. कोरोनाची स्थिती पाहून त्याबाबतही लवकरच निर्णय होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
लोकमत संवाद
अहमदनगर : राज्यातील कोरोनाची सध्याची स्थिती पाहता पदवी परीक्षा घेणे केवळ अशक्य आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून केंद्राने, तसेच यूजीसीने आपला निर्णय बदलून या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करावे, असे स्पष्ट करीत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षांबाबत धोरण ठरविण्याचे काम सुरू आहे. कोरोनाची स्थिती पाहून त्याबाबतही लवकरच निर्णय होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्रीप्राजक्त तनपुरे यांनी दिली.
मंत्री तनपुरे यांनी शनिवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली असता, त्यांनी परीक्षांबाबत भाष्य केले. राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. पदवी परीक्षा घेण्याबाबत सर्व दृष्टीने सखोल आढावा घेण्यात आला. विद्यार्थी संघटना, महाविद्यालयांचे प्राचार्य, विअिवध विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही परीक्षा न घेण्याबाबत मते मिळाली. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांमध्येही याचा उल्लेख होता की, राज्यांनी कोरोनाची स्थानिक स्थिती पाहून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालावरून, राज्य शासनाच्या संमतीने परीक्षांबाबत निर्णय घ्यावा. त्या अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांनाही परीक्षा न घेण्याबाबत आम्ही विनंती केली. आता हा विषय न्यायालयातही गेला आहे. त्यामुळे केंद्राने किंवा यूजीसीने विद्यार्थीहिताचा, त्यांच्या आरोग्याचा विचार करता परीक्षा घेण्याचा आपला अट्टाहास सोडला पाहिजे, अशी अपेक्षा तनपुरे यांनी व्यक्त केली.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यात सप्टेंबरअखेरपर्यंत परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही. सध्या विविध कॉलेज, संस्था कोरोना सेंटरसाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने ते परीक्षेला येणार कसे, राहणार कोठे अशी सर्व गोंधळाची परिस्थिती आहे. त्यामुळे सप्टेंबरनंतर परीक्षा घेऊच शकत नाही. किती दिवस विद्यार्थ्यांच्या डोक्यावर परीक्षांची टांगती तलवार ठेवणार? सरासरी गुण, अंतर्गत मूल्यमापनावरून निकाल जाहीर करण्याचा पर्याय राज्याने दिला आहे. त्यामुळे केंद्राने यावर अंतिम निर्णय घेऊन हा गोंधळ थांबवला पाहिजे, असेही तनपुरे यांनी सूचवले.
बारावी परीक्षांचे निकाल लागले असून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रता परीक्षा घेण्याबाबत शासनाचे काय धोरण आहे, यावर विचारले असता, तनपुरे म्हणाले, याबाबत मागील महिन्यात सीईटी आयुक्तांशी चर्चा करून जिल्ह्यातील सीईटी सेंटर हे तालुकास्तरावर सुरू करण्याबाबत सांगितले होते. त्यावर त्यांनीहीबºयाच ठिकाणी हे सेंटर तालुकास्तरावर घेण्याची कार्यवाही केली होती, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यात लॉकडाऊनची आवश्यकता नाही
जिल्ह्यात प्रारंभी कोरोनाची स्थिती आटोक्यात होती. परंतु लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रूग्णांची संख्या वाढली. त्या पार्श्वभूमीवर नुकताच जिल्हा प्रशासनाबरोबर कोरोनाचा आढावा घेतला. त्यात पुन्हा लॉकडाऊन करावे का? याबाबत चर्चा झाली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत. तालुकास्तरावरही कोरोना सेंटर सुरू असल्याने रूग्णांची व्यवस्था होत आहे, असे जिल्हाधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या तरी लॉकडाऊनची गरज नाही, असे तनपुरे म्हणाले. परंतु कोरोना सेंटरमध्ये रूग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. कोरोना चाचण्या वाढवण्याबाबत सूचना दिल्या असून काही दिवसांतच रोज ७०० ते ८०० चाचण्या होतील, असे तनपुरे यांनी सांगितले.
विद्यापीठांचा तो निर्णय चुकीचाच
काही कृषी विद्यापीठांनी गुणपत्रिकांवर ‘कोविड प्रमोटेड’असा शिक्का मारला, याबाबत विचारले असता, हा प्रकार चुकीचा आहे. विद्यापीठांना असे करायला नको होते. कृषिमंत्र्यांनी त्यावर कार्यवाही केली आहे. इतर विद्यापीठांकडून असे होणार नाही, असे तनपुरे यांनी सांगितले.
लग्न समारंभातील गर्दीवर कारवाईची सूचना
लग्न समारंभासाठी मर्यादित लोकांना परवानगी असली तरी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे लक्षात येत आहे. त्यातूनही कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. याबाबत पोलिसांनी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु आनंदाच्या क्षणी अशी कारवाई होण्यापेक्षा गर्दीच होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेण्याची गरज असल्याचे तनपुरे म्हणाले.