रेल्वे पुलांच्या कामाची चौकशी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:45+5:302021-02-14T04:19:45+5:30
श्रीरामपूर : दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर पूर्वी असलेले रेल्वे गेट काढून त्या ठिकाणी भुयारी रस्ते मध्य रेल्वे प्रशासनाने तयार केले ...
श्रीरामपूर : दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर पूर्वी असलेले रेल्वे गेट काढून त्या ठिकाणी भुयारी रस्ते मध्य रेल्वे प्रशासनाने तयार केले आहेत. भुयारी रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले असून पावसाळ्यात पुलाखाली पाणी साचल्यामुळे राजमार्गाची वाहतूक अनेक वेळा बंद पडली होती. या निकृष्ट कामाची रेल्वे प्रशासनाने चौकशी करून ठेकेदारांवर कारवाई करून दुरुस्ती करून पुलाखाली पाणी साचणार नाही, याचे ठेकेदाराकडून लेखी घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
चितळी (ता. राहाता) रेल्वेस्टेशन जवळ व श्रीरामपूर एमआयडीसीजवळ धनगरवाडी रोडवर गेट नं. १५२, यशवंतबाबा चौकी येथे रेल्वे प्रशासनाने भुयारी रस्ते केले आहेत. २०२० मध्ये पावसाळ्यात व अवकाळी पावसामुळे असे ३ ते ४ वेळा पाणी साचून रस्त्याने होणारी वाहतूक सुमारे सप्ताहभर बंद राहिली होती. पाणी काढण्याचे इंजीन लावून पाणी बाजूच्या शेतात सोडण्यात आले होते. चितळी रेल्वेस्थानक भुयारी ब्रिज खाली पाणी साचल्यामुळे राहाता, चितळा, श्रीरामपूर हा राजमार्ग बंद पडला होता. ट्रॅक्टरवरील दोन पंप लावूनसुद्धा पाणी अनेक दिवस न हटल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन दैनंदिन उलाढालीवर परिणाम होऊन दूध, भाजीपाला व शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. रस्त्याने जाणारी वाहने व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करणे गरजेचे आहे. चितळी ग्रामपंचायतीच्या सरपंच दीपाली विष्णू वाघ व ग्रामपंचायत सदस्यांनी मध्य रेल्वे सोलापूर विभागास निवेदने देऊन भुयारी रस्ते पुलाखाली पाणी साचणार नाही, असे काम करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कार्यवाहीची मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने अद्याप भुयारी रस्ते दुरुस्तीचे काम केले नाही. पाणी साचू नये म्हणून कार्यवाही केली नाही. यावर्षीचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी भुयारी पुलाखाली पाणी साचणार नाही, असे काम करावे, अशी मागणी धनगरवाडी व चितळी ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने केली आहे. मे महिन्यापर्यंत काम न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
दोन्ही भुयारी रस्ते पुलाखाली गत पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागून वाहतूक खोळंबली होती. रेल्वे प्रशासनाने भुयारी रस्ते व पुलाखाली आतापर्यंत मोठा खर्च करून पाणी काढण्याचे काम केले हा खर्च पाण्यातच गेला अशी भावना ग्रामस्थांची असून पाणी साचणार नाही असे काम त्वरित करावे किंवा दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल करावेत अशी मागणी होत आहे.