तनपुरे कारखाना कामगारांचा मोर्चा
By Admin | Published: September 16, 2014 01:04 AM2014-09-16T01:04:49+5:302024-04-05T13:24:07+5:30
राहुरी : आधीच्या आंदोलनाला यश न आल्याने संतप्त झालेल्या डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी सोमवारी कारखान्याची संलग्न संस्था विवेकानंद नर्सिंग होमच्या
राहुरी : आधीच्या आंदोलनाला यश न आल्याने संतप्त झालेल्या डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी सोमवारी कारखान्याची संलग्न संस्था विवेकानंद नर्सिंग होमच्या केबिनला कुलूप लावून संताप व्यक्त केला़ कार्यकारी संचालक विजय पाटील यांनी मंगल कार्यालयात कामगारांशी चर्चा करून एक महिन्याचा पगार देण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांच्या घरावर काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला़
कामगारांनी सकाळी ११ वाजता श्री छत्रपती इंजिनिअरिंग कॉलेजवर मोर्चा काढला़ त्यानंतर मोर्चा कामगार नर्सिंग होमच्या प्रवेशद्वाराजवळ आला़ त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक बी़ के. शेंगापले, आऱ एस़ चव्हाण, सुनील कुटे यांनी मोर्चा अडविला़
आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असून कुलूप लावण्यास मज्जाव करू नये, असे कामगारांनी सुनावले़ प्रसाद तनपुरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला असता बुधवारी (दि. १७) कामगारांचे पगार करणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.
मोर्चासमोर बाळासाहेब चव्हाण यांनी कुलूप लावण्याचा आग्रह धरला़ यावेळी सोमनाथ वाकडे, सुरेश थोरात, सुरेश लांबे यांची भाषणे झाली़ प्राचार्य डॉ़ प्रकाश आढाव मोर्चाला सामोरे गेले़ कार्यकारी संचालक विजय पाटील, संचालक अरूण ढूस, श्रीराम गाडे, ज्ञानदेव वराळे यांनी कामगारांशी चर्चा केली़
यावेळी झालेल्या चर्चेत बाळासाहेब चव्हाण, भाऊसाहेब पगारे, सुरेश थोरात, नारायण चव्हाण, सुधाकर कराळे, अर्जुन दुशिंग, नारायण मुसमाडे, सीताराम नालकर, संदीप गडाख आदी कामगारांनी संचालकांशी चर्चा केली़ त्यानंतर राहुरी येथे काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्यात आला़ मात्र धरणे आंदोलन पूर्ववत सुरू राहणार असल्याचे कामगारांनी स्पष्ट केले़
(तालुका प्रतिनिधी)