पेट्रोल पंपावरील कामगारांनी एटीएम क्लोन करून लुटले ग्राहकांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 08:14 PM2021-05-15T20:14:21+5:302021-05-15T20:15:21+5:30
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लोन करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सायबर पोलीस व भिंगार कॅम्प पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.
अहमदनगर : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लोन करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सायबर पोलीस व भिंगार कॅम्प पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.
सूरज अनिल मिश्रा (वय २३) व धीरज अनिल मिश्रा (वय ३१, दोघे रा. टोकेवाडी, ठाणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे दोघे सख्खे भाऊ आहेत. पोलिसांनी या दोघांकडून २ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे दोघे आरोपी काही दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील आरणगाव येथील पेट्रोल पंपावर कामाला होते. पेट्रोल भरल्यानंतर ग्राहकांनी एटीएमच्या माध्यमातून पेमेंट दिल्यानंतर हे आरोपी त्यांच्याकडे असलेल्या स्कीमर मशीनच्या माध्यमातून ते एटीएम क्लोन करायचे. तसेच यावेळी ग्राहकाच्या एटीएमचा पिन नंबरही विचारून घ्यायचे. असे बहुतांश एटीएम कार्ड क्लोन केल्यानंतर या दोघांनी पेट्रोल पंपावरील काम सोडून दिले. क्लोन केलेल्या एटीएमचा डाटा वापरून बनावट कार्ड तयार करत आरोपींनी एटीएममधून पैसे काढण्यास सुरुवात केली. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस व सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपींचा शोध घेतला. या दोघा आरोपींना टोकेवाडी येथून जेरबंद करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना १९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, हेडकॉन्स्टेबल योगेश गोसावी, गोविंद गोल्हार पोलीस नाईक उमेश खेडकर, दिगंबर कारखिले, राहुल द्वारके, राहुल गुंडू अभिजीत अरकल, वासुदेव शेलार आदींच्या पथकाने तपास करून आरोपींना जेरबंद केले.