जागतिक स्तनपान जागृती सप्ताह : आईचे दूध हिच बाळाची संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:59 PM2019-08-04T13:59:42+5:302019-08-04T14:02:23+5:30

आईच्या दुधाचे महत्त्व आपण अनेकदा ऐकत असतो. मात्र सध्याच्या धावत्या जगातल्या आजच्या आईला आपल्या बाळाची ही निकड किती प्रमाणात पूर्ण करता येते हा प्रश्नच आहे.

 World Breastfeeding Awareness Week: Breastfeeding baby's milk | जागतिक स्तनपान जागृती सप्ताह : आईचे दूध हिच बाळाची संजीवनी

जागतिक स्तनपान जागृती सप्ताह : आईचे दूध हिच बाळाची संजीवनी

अरुण वाघमोडे
अहमदनगर : आईच्या दुधाचे महत्त्व आपण अनेकदा ऐकत असतो. मात्र सध्याच्या धावत्या जगातल्या आजच्या आईला आपल्या बाळाची ही निकड किती प्रमाणात पूर्ण करता येते हा प्रश्नच आहे. जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफच्या विद्यमाने संयुक्त स्तनपान आणि बालकांचे आरोग्य विषयी जनजागृतीपर अभियान राबविले जाते. दरवर्षी ७ आॅगस्ट हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याच संदर्भात बालरोगतज्ज्ञ डॉ़ अनिलकुमार    कु-हाडे यांच्याशी साधलेला संवाद़़

प्रश्न : स्तनपान आई आणि बाळासाठी किती महत्त्वाचे आहे?
उत्तर : आईचं दूध हे बाळासाठी अमृतच आहे़ अलीकडे काही माता बाळाला अंगावर पाजण्यासाठी उत्सुक नसतात. बाळासाठी आईचं दूध हे पूर्णान्न आहे, हे लक्षात घ्यायला हवं. बाळाला वयाच्या सहा महिन्यांपर्यंत केवळ हाच आहार देण्यात येतो. पण बाळाला योग्य प्रकारे स्तनपान देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण चुकीच्या पद्धतीने आईला काही समस्या उद्भवू शकतात. तसेच बाळांना कुपोषण होऊ शकते. परिणामी अनेकदा संसर्ग होतो. त्यामुळे आईला ज्या स्थितीमध्ये आरामदायी वाटत असेल, त्या स्थितीत तिने स्तनपान द्यावे.

प्रश्न : जन्मानंतर किती वेळाने बाळाला आईचे दूध द्यावे ?
उत्तर : आईच्या दुधामुळे बाळाला वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकणाऱ्या संसर्गाचं प्रमाण कमी होते, कारण आईच्या दुधामध्ये प्रतिजैविक असतात. सामान्य प्रकृती असलेल्या बाळाला जन्मानंतर तीस मिनिटांच्या आत बाळाला आईचे दूध द्यावे़आईच दूध निर्जंतुक असतं. त्यामुळेच बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्याचा लाभ मुलांना भावी आयुष्यात होतो.रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार, दमा यासारख्या आजारांपासून बाळाच संरक्षण होतं.

प्रश्न : बाळाला आईचे दूध सुरू असेपर्यंत पाणी देण्याची गरज असते का?

उत्तर : बाळाला आईचे दूध सुरू असेपर्यंत सहा महिने बाळाला वेगळे पाणी पाजण्याची गरज नसते. दुधातून बाळाला अधिक प्रमाणात लॅक्टोज, प्रथिने, जीवनसत्त्वे, क्षार आणि पाणी मिळते, त्यामुळे त्याची तहानही भागते. स्तनपानामुळे बाळाची तहान, भूक दोन्ही भागते. स्तनपानानंतर बाळाला ढेकर देण्यास मदत करावी. सहा महिन्यानंतर उकळून गार केलेले पाणी थोड्या प्रमाणात देण्यास हरकत नाही़

आईच्या आरोग्यावर परिणाम होतो?

स्तनपानाचे फायदे बाळाबरोबर आईलाही होत असतात. हे फायदे केवळ शारीरिक नसून मानसिकही असतात. आई व बाळामधील भावनिक बंध घट्ट होण्यास मदत होते. स्तनपान देताना आईने मानसिक ताण, संदेह, संकोच ठेवू नये. दुधाची निर्मिती व दूध स्रवणे याक्रिया मेंदूच्या नियंत्रणाखाली असतात. गरोदरपणात वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होते. प्रसुतीनंतर होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव कमी होतो. उतारवयातील हाडांचा ठिसूळपणा, स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होतो.

बाळ जितके जास्त दूध पिईल तितके अधिक दूध निर्माण होते. काही मातांना स्वत:ला पुरेसे दूध येणार नाही अशी भिती वाटत असते व त्यामुळे त्याबरेचदा बाळाला सुरुवातीच्या काही महिन्यांमध्येच वरचे दूध व पाणी चालू करतात. परंतु यामुळे बाळ स्तनपान कमी करते. परिणामी आईला कमी दूध येते, बाळ सशक्त होत नाहीत. त्यामुळे बाळ मागेल तेव्हा स्तनपान करावे. -डॉ. अनिलकुमार कु-हाडे

 

 

 

Web Title:  World Breastfeeding Awareness Week: Breastfeeding baby's milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.