जागतिक पर्यावरण दिन : कचऱ्याचा धूर सावेडीकरांच्या नाकातोंडात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:07 PM2019-06-05T13:07:33+5:302019-06-05T13:21:59+5:30
सावेडी कचरा डेपोला लागलेली आग महापालिकेच्या बेफिकिरीमुळे दुसºया दिवशी मंगळवारीही आटोक्यात येऊ शकली नाही़
अहमदनगर : सावेडी कचरा डेपोला लागलेली आग महापालिकेच्या बेफिकिरीमुळे दुसºया दिवशी मंगळवारीही आटोक्यात येऊ शकली नाही़ आतापर्यंत सुमारे दोन लाख लिटरहून अधिक पाण्याचा मारा करण्यात आला़ मात्र इतर कचरा पे्रस करणे, आग न लागलेला कचरा वेगळा करणे, यासारख्या उपाययोजना पालिकेने केल्या नाहीत़ त्यामुळे आग आणखी भडकली असून, धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे़
जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येलाच महापालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे.महापालिकेच्या सावेडी कचरा डेपोला सोमवारी सायंकाळी अचानक आग लागली़ वाºयामुळे आग भडकली़ काही वेळातच आगीने डेपोतील सर्व ढीग वेढले गेले़ महापालिकेचे दोन अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले़ त्यापैकी एक बंब बंद पडला़रात्री उशिराने श्रीगोंदा, राहुरी आणि देवळाली प्रवरा आणि नागापूर एमआयडीसीचे अग्निशमनबंब मदतीला आले़ डेपोतील शेडभोवती सुमारे २५ ते ३० फूट उंचीचे चार कचºयाचे मोठे ढीग आहेत़ या सर्व ढिगांतून धूर बाहेर पडत होता़ पैकी प्रवेशव्दारासमोरील ढिगातून तर आगीचे मोठे लोळ बाहेर पडत होते़ त्यामुळे अग्निशमन सुरक्षा रक्षकांनी सर्वप्रथम या ढिगावर लक्ष केंद्रीत केले़ सोमवारी सायंकाळपासून तब्बल सहा बंब या एकाच ढिगाºयावर पाणी मारत आहेत़ पण, आग आटोक्यात आली नाही़ अन्य ढिगाऱ्यांतूनही धुराचे लोळ बाहेर पडत होते़ आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमन बंब चालकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पाणी जागेवर उपलब्ध होत नाही़ पाणी भरून आणण्यासाठी वसंत टेकडीला जावे लागते़ त्यात अर्धा तास जातो़ सकाळी बंबातील इंधन संपलेले आहे़ इंधन देण्याची मागणी पालिकेकडे केली़ परंतु, प्रतिसाद मिळाला नाही़ नियोजनाचा अभाव असल्यामुळे आग आटोक्यात येत नसल्याचे चालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले़
आग विझविण्याचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होते़ सावेडी उपनगरांतील तपोवन रस्ता, ढवण वस्ती परिसरात धुराचे साम्राज्य आहे.
शहरात कचरा वर्गीकरणाची गरज
अहमदनगर : कचरा डेपोला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी कचरा वर्गीकरणाची गरज आहे. त्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा महावीर पोखरणा यांनी व्यक्त केली. बुरुडगाव रोडवरील महापालिकेचा डेपो प्रशासकीय अनास्थेमुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा कचरा सावेडीतील डेपोत आणून क्षमतेपेक्षा जास्त टाकला जात आहे. कचरा डेपोस संरक्षक भिंत , सुरक्षारक्षक, सीसीटीव्हीचाही अभाव आहे. सावेडीच्या कचरा डेपोमध्ये कचºयावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका व संबंधित ठेकेदार यांच्यात झालेल्या करारानुसार सावेडी कचरा डेपोच्या पूर्ण संरक्षणाची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे कचरा डेपोला लागलेल्या आगीची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मागील वर्षी मे महिन्यात आग लागण्याची घटना घडली होती. थर्माकॉल, फायबर असे साहित्य कचरा डेपोत येत आहे. तापमान आणि कचºयाच्या ढिगाºयाखालून ‘मिथेन’वायू येत आहे. आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा केला की ‘लिचेड’तयार होते. त्यामुळे ‘मिथेन’वायू तयार होत असल्याने आग भडकत होती. सावेडी कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे आरोग्यास घातक अशा मिथेन वायूच्या विळख्यात सापडल्यामुळे भोवतालच्या परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. श्वसनाच्या त्रासामुळे अनेकांना रूग्णालयात दाखल करावे लागले. वातावरणातही धुराचे साम्राज्यच पसरले असल्याने हवेच्या प्रदूषणाची समस्या अजूनच बिकट बनली आहे.
महापालिकेच्या सावेडी
येथील कचरा डेपोला आग लागल्यानंतर कचरा वर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिक ओला, सुका आणि घातक कचरा वेगळा करुन देत नाहीत.
चहा, नाष्टा न दिल्याने सुरक्षा रक्षक संतापले
अहमदनगर: सावेडी कचरा डेपोला लागलेली आग विझविण्यासाठी बाहेरून अग्निशमन बंब बोलविण्यात आले होते़ श्रीगोंदा, राहुरी, देवळाली आणि एमआयडीसीचे चार बंब सोमवारी सायंकाळपासून आग विझविण्याचे काम करत होते़ या कर्मचाºयांनी रात्रभर काम केले़ त्यांना पालिकेने रात्री तर जेवण दिलेच नाही़ मंगळवारी सकाळी चहा- नाष्ट्याची मागणी केली असता कर्मचाºयांनाच सुनावले़ त्यामुळे संतापलेल्या कर्मचाºयांनी थेट जिल्हाधिकाºयांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला़ जिल्हाधिकाºयांनी आदेश देताच काही वेळातच चहा व नाष्टा घेऊन पालिकेचे कर्मचारी डेपोवर दाखल झाले़ सोमवारी सायंकाळी अग्निशमन बंबासह कर्मचारी कचरा डेपो परिसरात दाखल झाले़ रात्रभर त्यांनी काम केले़ काहीजण सोमवारी सहा वाजेच्या सुमारास आलेले होते़ लोकमतचे प्रतिनिधी मंगळवारी सकाळी डेपो परिसरात दाखल झाले़ त्यावेळी अग्निशमन बंबाच्या सुरक्षा रक्षकांत कुजबुज सुरू होती़ त्यांच्याशी संपर्क साधला असता, साहेब एका फोनवर आग विझविण्यासाठी आलो़ सोबत काहीही आणले नाही़ सहा वाजता कामाला सुरुवात केली़ रात्री पालिकेने जेवण दिले नाही़ सकाळी चहा नाष्ट्याची मागणी केली असता हे काही आमचे घरचे काम नाही, असे उत्तर मिळाले़ ज्यांच्या सांगण्यावरून आलो़ त्या पालिकेच्या कर्मचाºयांनीच हात वर केले़ चहा नाष्ट्याचीही सोय पालिकेने केली नाही, अशी नाराजी बंब चालकांनी व्यक्त केली़
लाखो लिटर पाण्याचा वापर
आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून योग्य नियोजन केले गेले नाही़ त्यामुळे वसंत टेकडी येथील पिण्याचे पाणी आग विझविण्यासाठी वापरण्यात आले़ सुमारे दोन लाख लिटरहून अधिक पाणी कचºयाला लागलेली आग विझविण्यासाठी वापरण्यात आले़
पाणी वाहतुकीसाठी एकच टँकर
कच-याला लागलेली आग विझविण्यासाठी सहा बंब कार्यरत होते़ एका बंबाला ४ ते ५ हजार लिटर पाणी लागते़ हे पाणी पुरविण्यासाठी पालिकेने एकच टँकर ठेवला होता़त्यामुळे वेळेवर पाणी उपलब्ध होत नव्हते़ काही बंब वसंत टेकडी येथून पाणी भरून आणत होते़
बंबांना वेळेवर डिझेल नाही
सोमवारी बंब घटनास्थळी दाखल झाले होते़ ते मंगळवारी सकाळपर्यंत सुरू होते़ सकाळी इंधन संपल्याने बंब बंद झाले.
चालकांनी पालिकेच्या कर्मचाºयांकडे इंधनाची मागणी केली मात्र, प्रतिसाद मिळाला नाही़ त्यामुळे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास काम थांबविण्यात आले़ दुपारी इंधन मिळाल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली़
अपुरे मनुष्यबळ
कचरा डेपो खासगी संस्थेचा असला तरी आग विझविण्याची जबाबदारी पालिकेची आहे़ असे असताना पालिकेचे पुरेसे कर्मचारी घटनास्थळी आले नाहीत़ आरोग्य अधिकारी व मुख्य स्वच्छता निरीक्षक हजर होते़ तेही दुपारी निघून गेले़